ओरांग उटानच्या पिलांना मायेचा मराठी हात

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
care for the orangutan cub
नागपूर : ओडिशातील बालासोर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी ओरांग उटानची पाच पिले वनरक्षकांना गस्तीदरम्यान जंगलात सापडली होती. मातेपासून वेगळी झालेली आणि केवळ आठ महिने ते दीड वर्ष वयाची ही पिले नंदनकानन येथील प्राणिसंग्रहालयात आणण्यात आली. मातेपासून वेगळ्या झालेल्या या पिलांची काळजी मूळ नागपूरकर असलेले उपसंचालक प्रदीप मिरासे यांच्या नेतृत्वात घेतली जात आहे. ओरांग उटानच्या तस्करीची ही घटना देशभरातील वनवर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

 सविस्तर वृत्त...४
गिर्यारोहक, शेर्पाचा हिमस्खलनात मृत्यू

काठमांडू : जगातील आठव्या क्रमांकाचे उंच शिखर असलेल्या मनास्लू पर्वतावर हिमस्खलन होऊन कॅम्प-३ येथील तंबूवर हिम कोसळल्याने भारतीय-जर्मन गिर्यारोहक आणि त्याच्या नेपाळी शेर्पा मार्गदर्शकाचा मृत्यू झाला. मोहिमेचे आयोजन करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. ध्रुव ज्योती गुहा आणि फुरसेम्बा शेर्पा हे प्रतिकूल हवामान असतानाही कॅम्प-२ वरून पुढील उंच कॅम्पच्या दिशेने रवाना झाले होते. शनिवारी रात्री ते हिमस्खलनाच्या तडाख्यात सापडले, अशी माहिती ‘मकालू अॅडव्हेंचर’चे व्यवस्थापकीय संचालक मोहन लामसाल यांनी दिली.

जयशंकर करणार शिष्टमंडळाचे नेतृत्व

नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर न्यूयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या ८१ व्या महासभेच्या अधिवेशनात भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. महासभेच्या उच्चस्तरीय अधिवेशनात जयशंकर यांचे भाषण २६ सप्टेंबरला होणार आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

‘मान दा मुनाफा’ मोहीम पंजाबात सुरू

धुरी : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी रविवारी, विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या घराघरांत प्रचार मोहिमेला सुरुवात केली. ‘मान दा मुनाफा’ या संकल्पनेच्या माध्यमातून कल्याणकारी योजनांचा प्रचार करताना, विविध योजनांमुळे पंजाबमधील प्रत्येक कुटुंबाला दर वर्षी १.८२ लाखांचा लाभ होत असल्याचा दावा त्यांनी केला. सरकारच्या कामांचा लेखाजोखा घेऊन ‘आप’ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल, असे त्यांनी सांगितले.

टाटा ट्रस्टची बाजू सिंघवी मांडणार

नवी दिल्ली : टाटा सन्सने अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना आणखी पाच वर्षांची मुदतवाढ देण्यास दिलेला पाठिंबा आणि त्याच वेळी टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी या प्रस्तावाला केलेला विरोध यामुळे टाटा समूहात वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, टाटा ट्रस्ट्सने न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांची नियुक्ती केली आहे.

 संबंधित वृत्त...फ्रंट पेज २