Chaos In Ulhasnagar And Ambernath A Series Of Murders And Drug Trade In Turmoil
कायदा-सुव्यवस्था धाब्यावर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
परिमंडळ ४मध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. उल्हासनगर शहरात सुरू असलेले हत्यासत्र, अंबरनाथ शहरात वाढत असलेली अमली पदार्थ विक्री आणि अंबरनाथ-उल्हासनगर शहरात सुरू असलेला जुगाराचा बाजार यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे आता गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक या कारवायांसाठी शहरात सक्रिय झाले आहे. एकूणच कायदा-सुव्यवस्थेची स्थिती पाहता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
ऐन गणेशोत्सवात उल्हासनगर येथील सुभाष टेकडी भागात पूर्ववैमनस्यातून रोहित जगदाळे या तरुणाची हत्या करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी उल्हासनगरमध्ये भररस्त्यात गोळीबारात दोन भावांची हत्या झाली. त्यानंतर उल्हासनगरमध्ये आणखी तीन, तर अंबरनाथमधील पालेगावात एक, अशा चार तरुणांच्या हत्या झाल्या आहेत.अंबरनाथ शहरातील अमली पदार्थांचे विक्रेते आणि पुरवठादारांचे जाळे उद्ध्वस्त करण्यात पोलिस अपयशी ठरत असल्याचा आरोप होत आहे. अनेकदा जिल्ह्याबाहेरील अथवा गुन्हे शाखेच्या पथकांना शहरात अमली पदार्थांचा साठा सापडत असताना स्थानिक पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडत आहे.
सध्या सुरू असलेला गणेशोत्सव आणि आगामी नवरात्र, दिवाळीचा उत्सवकाळ पाहता परिमंडळ ४मधील कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. मात्र सध्या तरी गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यात पोलिस यंत्रणेला अपयश आल्याची चर्चा होत आहे.