Nagpur Metros Third Phase Potential For Underground Route And Driverless Features
तिसऱ्या टप्प्यात भूमिगत मेट्रोची शक्यता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे काम गतीने सुरू असतानाच तिसऱ्या टप्प्याची प्रक्रियाही हाती घेण्यात आली आहे. या टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर तयार करण्याचे काम ‘राइट्स’ कंपनीला देण्यात आले आहे. कस्तुरचंद पार्क ते कोराडी या मार्गावर उड्डाणपूल असल्याने येथे भूमिगत मेट्रोचा पर्याय विचाराधीन आहे. डीपीआरमध्ये याबाबतची भूमिका स्पष्ट होईल, असे महामेट्रोकडून सांगण्यात आले.
दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोचे काम आतापर्यंत ४५ टक्के पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२७ हे उद्दिष्ट ठेवून कामाला गती देण्यात आली असून नियोजित वेळेत मेट्रो धावण्यास सुरुवात होईल, अशी अपेक्षा महामेट्रोने व्यक्त केली आहे. दुसरीकडे तिसऱ्या टप्प्यासाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे. सर्वेक्षणाचा कालावधी सहा महिन्यांचा असून त्यातील दोन महिने पूर्ण झाले आहेत. जानेवारी २०२७मध्ये डीपीआर सादर करण्याचा मानस महामेट्रोचा आहे.मेट्रोच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मार्ग प्रामुख्याने एलिव्हेटेड म्हणजे रस्त्याच्या वरून आहेत. मात्र, तिसऱ्या टप्प्यात कस्तुरचंद पार्क ते कोराडी मार्गावर उड्डाणपुलामुळे एलिव्हेटेड मार्ग उभारणे प्रथमदर्शनी कठीण वाटत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भूमिगत मार्गाचा विचार सुरू झाला आहे. भूमिगत मेट्रोचा पर्याय स्वीकारल्यास हा मार्ग सुमारे सहा किलोमीटरपर्यंत असू शकतो.
‘चालकविरहित’चा प्रस्ताव
तिसऱ्या टप्प्यात चालकविरहित मेट्रो धावण्याचे नियोजन आहे. विविध देशांमध्ये चालकविरहित मेट्रो यशस्वीपणे धावत असून नागपूरच्या तिसऱ्या टप्प्यातही असा प्रस्ताव दिला जाणार आहे. यामुळे मेट्रोच्या संचालनातील अचूकता वाढेल, असा विश्वास महामेट्रोने व्यक्त केला आहे. तिसऱ्या टप्प्यात सीताबर्डी ते कोराडी या ११.५ किलोमीटर, खापरी ते नवीन नागपूर या १५ किलोमीटर, तर बुटीबोरी ते सीएट लिमिटेड या तीन किलोमीटर मार्गांसह इनर रिंगरोडचा समावेश आहे. ज्या मार्गांवर मेट्रो शक्य नाही, तेथे मास रॅपिड ट्रान्झिट कॉरिडॉर्सअंतर्गत जलद बससेवा सुरू करण्याचे नियोजन आहे.
मानकापूर चौक ते रचना जंक्शन, रिंग रोड : २५ किलोमीटर
सीताबर्डी ते कोराडी : ११.५ किलोमीटर
अग्रसेन चौक ते फॉरेस्ट चेक नाका, दिघोरीमार्गे : ८.५ किलोमीटर
वाडी ते सीताबर्डी : ८.१ किलोमीटर
छावणी टी-पॉइंट ते फेटरी, काटोल नाकामार्गे : ११ किलोमीटर
मानकापूर चौक ते वासुदेवनगर, काटोल नाकामार्गे : १४.६ किलोमीटर
व्हरायटी चौक ते वेळा हरिश्चंद्र : १३.७ किलोमीटर
वाडी ते वानाडोंगरी, सीताबर्डीमार्गे : ९.८ किलोमीटर
मानकापूर चौक ते लोणारे, गोधनी मार्ग : ७.३ किलोमीटर