Ganapati Visarjan 2023 Heartfelt Farewell In Thane
गणरायाला भावपूर्ण निरोप
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
लाडक्या गणरायासह गौराईला शनिवारी ठाण्यातील विविध विसर्जन घाटांवर साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. ठाणे महापालिका क्षेत्रात सहाव्या दिवशी विसर्जन घाटांवर केलेल्या नियोजनानुसार एकूण १६ हजार ५३ गणपती मूर्तींचे, तसेच १ हजार ३९ गौरी मूर्तींचे विसर्जन झाले. गणपती व गौरींच्या मिळून एकूण १७ हजार ९२ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
गणपती विसर्जनासाठी टँक विसर्जन व्यवस्था, मूर्ती स्वीकृती व्यवस्था, कृत्रिम तलाव, खाडी घाट, तसेच फिरती विसर्जन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती. या विविध व्यवस्थांच्या माध्यमातून नागरिकांना सुलभ व सुरक्षित विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. विसर्जित गणपती मूर्तींच्या एकूण १६ हजार ५३ मूर्तींपैकी ३ हजार ७२६ मूर्तींचे टँक विसर्जन व्यवस्थेद्वारे, १५८ मूर्तींचे मूर्ती स्वीकृती व्यवस्थेद्वारे, १० हजार २०७ मूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये, १ हजार ९३८ मूर्तींचे खाडी घाटांवर, तर २४ मूर्तींचे फिरत्या विसर्जन व्यवस्थेद्वारे विसर्जन करण्यात आले.प्रभागनिहाय संख्या
उथळसर येथे ६१२, नौपाडा-कौपरी येथे २ हजार ८०९, कळवा येथे २ हजार ४९१, दिवा येथे ८२९, मुंब्रा येथे ३४८, माजिवडा-मानपाडा येथे ३ हजार ७५८, लोकमान्य-सावरकर येथे २३०, वागळे येथे २ हजार ७४९ आणि वर्तकनगर येथे २ हजार २२७ गणपती मूर्तींचे विसर्जन झाले. सर्व प्रभाग समित्यांमध्ये मिळून १ हजार ३९ गौरींचे विसर्जन सहाव्या दिवशी करण्यात आले.