Gauri ganpati Immersion Procession In Thane Bustling With Drums And Traditional Instruments
डीजे कमी; दणदणाट जास्त
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
ठाण्यातील विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर कमी असला, तरी त्याची जागा आता मोठ्या ढोल-ताशांसह ध्वनिवर्धक आणि मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या धातूच्या टोल वाद्यांनी घेतल्याचे चित्र शनिवारी गौरी-गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये दिसून आले. १९ सप्टेंबर रोजी झालेल्या घरगुती गौरी-गणपती विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते व जनहित याचिकाकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी केलेल्या ध्वनिपातळीच्या निरीक्षणात ध्वनिपातळी १०५ डेसिबलपर्यंत पोहोचली होती. विशेष म्हणजे, दीड दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी नोंदवलेल्या १०० डेसिबलच्या कमाल पातळीच्या तुलनेत यावेळी ध्वनिपातळी १०५ डेसिबलपर्यंत वाढल्याचे दिसून आले.
ठाण्यातील राम मारुती रोडवर रात्री ९.३० वाजता ८५ ते ९० डेसिबल ध्वनिपातळी नोंदविण्यात आली. या मार्गावर अनेक मिरवणुका एकाच वेळी सुरू होत्या. बहुतांश मिरवणुकांमध्ये ढोल-ताशे आणि बॅन्जो होते, तर सुमारे निम्म्या मिरवणुकांमध्ये स्पीकर्स, साउंड सिस्टीम वापरल्या जात होत्या. या परिसरातील आवाजाची सरासरी पातळी ८५ ते ९५ डेसिबल असल्याचे निरीक्षणात नमूद करण्यात आले. पाचपाखाडी रोडवर रात्री १० वाजता ९० ते ९५ डेसिबल, तर टीएमसी सर्कल येथे रात्री १०.३० वाजता ९० ते ९५ डेसिबल ध्वनिपातळीची नोंद झाली.गौरी-गणपती विसर्जनाच्या निरीक्षणात बॉलिवूड गाण्यांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. मात्र, डीजेची जागा मोठ्या संख्येने ढोल, साउंड सिस्टीम आणि टोल वाद्यांनी घेतल्याने एकत्रित आवाजाची तीव्रता कमी झालेली नसल्याचे निरीक्षणातून दिसते. काही मिरवणुकांमध्ये फटाक्यांचाही वापर झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. डॉ. बेडेकर यांच्या निरीक्षणानुसार, मागील वर्षांच्या तुलनेत ध्वनिपातळीत कोणतीही घट झालेली दिसून आली नाही. उलट, डीजेचा वापर कमी होत असताना अनेक ढोल आणि नव्या धातूच्या वाद्यांमुळे कर्णकर्कश आवाज कायम राहिला. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीमध्ये कानठळ्या बसवणारा अनुभव येत असून अनेकांना त्यामुळे गंभीर त्रास झाल्याची शक्यता डॉ. महेश बेडेकर यांनी व्यक्त केली आहे.