इम्फाळ : ‘हे क्रूर कृत्य आहे. यास जबाबदार असलेल्यांची ओळख पटवून त्यांच्याविरोधात कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल,’ असे स्पष्ट करीत मुख्यमंत्री वाय. खेमचंद सिंह यांनी हल्ल्याचा निषेध केला. ‘हा मानवतेवरील हल्ला असून मणिपूरमध्ये कष्टाने मिळवलेली शांतता बिघडवण्याचा थेट प्रयत्न आहे. कोणत्याही परिस्थिती हे दहशतवादी कृत्य सहन केले जाणार नाही,’ असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांनी या घटनेत मृत्यू झालेल्या दोन मुलांच्या जखमी आईची खासगी रुग्णालयात भेट घेतली. मोइरांग ट्रोंग्लाओबी चुराचंदपूरच्या डोंगराळ भागाजवळ आहे. २०२३ आणि २०२४मध्ये मैतेई आणि कुकी-झो गटांमधील वांशिक संघर्षादरम्यान येथे सातत्याने गोळीबार झाला होता. मंगळवारी ट्रोंगलाओबीच्या जवळच्या परिसरातून एक स्फोटक उपकरणही जप्त करण्यात आले, असे आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, ‘सीआरपीएफ तळावर आंदोलकांनी प्रवेश करू नये. बॉम्बहल्ल्यात सामील असलेल्या आरोपींना पकडण्यासाठीच्या मोहिमेवर सुरक्षा दलांना लक्ष केंद्रीत करू द्यावे, अशी विनंती मी केली होती, परंतु आंदोलकांनी या आवाहनाकडे दुर्लक्ष केले आणि त्यांनी तळावर हल्ला करत नासधूस केली. परिणामी सुरक्षा दलांनी गोळीबार केला,’ असे गृहमंत्री कांथौजम म्हणाले.
तीन दिवस इंटरनेट बंद
या घटनेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने मणिपूरमधील पाच जिल्ह्यांत ब्रॉडबँड, व्हीसॅट, व्हीपीएनसह इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश मणिपूर सरकारने मंगळवारी प्रसृत केले. गृह आयुक्त एन. अशोक कुमार यांनी याबाबतच्या आदेशावर स्वाक्षरी केली. इम्फाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व, थौबल, काकचिंग, विष्णूपूर या पाच जिल्ह्यांत तीन दिवसांसाठी ही बंदी असेल.








