निंगबो (चीन) : ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो या भारताच्या मिश्र दुहेरीतील जोडीने मंगळवारी आशिया अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. मात्र, रोहन कपूर - ऋत्त्विका शिवानी गड्डे या जोडीला पहिल्या फेरीचा अडथळा पार करता आला नाही. ध्रुव आणि तनिषा यांनी थायलंडच्या फुवानात होरबनलुएकित आणि बेन्यापा आइम्सार्ड यांची कडवी झुंज २१-१४, ११-२१, २१-१५ अशी मोडून काढली. दरम्यान ३४ मिनिटे रंगलेल्या सामन्यात रोहन - ऋत्त्विका यांना आठव्या मानांकित गोह सून हुआत आणि लाय शेवॉन जेमी (मलेशिया) यांच्याकडून १३-२१, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला.
महाराष्ट्राचा पराभव
रांची : महाराष्ट्राच्या मुले आणि मुलींच्या संघांना सब-ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला. बिहारमधील राजगीर येथे ही स्पर्धा सुरू आहे. मुलांच्या गटात पंजाबने महाराष्ट्रावर २-०ने मात केली. मुलींच्या गटात झारखंडने महाराष्ट्राला ६-०ने नमविले. या पराभवानंतरही मुलींचा संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला.
‘व्हेरॉक’चा विजय
पुणे : व्हेरॉक संघाने १४ वर्षांखालील गटाच्या व्हेरॉक कप वन-डे क्रिकेट स्पर्धेत शिरूर स्पोर्ट्स क्लबवर सात विकेटनी मात केली. स्पर्धेचे उद्घाटन माजी रणजीपटू प्रसाद कानडे ह्यांच्या हस्ते झाले. या वेळी चंदन गंगावणे, शादाब शेख, राहुल वेंगसरकर, आणि विजय पाटील उपस्थित होते. संक्षिप्त धावफलक : शिरूर स्पोर्ट्स क्लब - ४० षटकांत ७ बाद १५६ (विराट वानखेडे ६९, शाश्वत भुयरे ३९, सात्त्विक बोम्बले ४-१९) पराभूत वि. व्हेरॉक - १२ षटकांत ३ बाद १५७ (सिद्धान्त लाडे ७४, आराध्य कळमेघ ४२, नील राजगुरू २-६, आरव लाड १-४१).








