मंडी : ‘हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकार पुढील १८ महिन्यांत सत्तेबाहेर जाईल आणि नागरिकांच्या पाठिंब्याने भाजप पुढील सरकार स्थापन करील,’ असा दावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांनी केला. राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना चुग यांनी काँग्रेसवर टीका करताना राहुल गांधींना लक्ष्य केले. गेल्या साडेतीन वर्षांत काँग्रेस सरकारने राज्याला विकासाच्या मार्गावरून भरकटवले असून, हिमाचलला ३५ वर्षे मागे ढकलले असल्याचा आरोप चुग यांनी केला.
घरावर गोळीबार
जमशेदपूर : जमशेदपूरच्या आदित्यपूर उपनगरात भाजप नेते सपन दास यांच्या निवासस्थानावर मंगळवारी भरदिवसा गोळीबार झाला. ही घटना ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांमध्ये बंदिस्त झाली असून, गोळीबारामुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रस्नचिन्ह उपस्थित होत आहे. हल्लेखोर स्कूटरवरून आले होते. त्यांनी दास यांच्या घरावर तीन फैरी झाडल्या. हल्ल्यादरम्यान त्यांनी शिवीगाळही केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.
२५ कोटींचे ड्रग्ज जप्त
अहमदाबाद : पाच किलो ‘मेथॅम्फेटामाइन’ बाळगल्याच्या आरोपावरून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. गुजरात आणि राजस्थान दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ही कारवाई केली. हे अमली पदार्थ आरोपींनी पाकिस्तानमधून भारतात तस्करीसाठी आणल्याचा संशय असून, याचे बाजारमूल्य अंदाजे २५ कोटी रुपये आहे. शंकरराम आणि लालाखान अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पूल कोसळला
शिमला : हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यातील होली-खरामुखा रस्त्यावरील बांधकामाधीन पूल मंगळवारी सकाळी भूस्खलनामुळे कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुलाचे काम अंतिम टप्प्यात होते. पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे वारंवार होणाऱ्या भूस्खलनांमुळे होलीचा संपर्क तुटतो. यामुळे हा पूल उभारण्यात येत होता. मात्र, तोच कोसळल्याने या भागातील दळण-वळणावर परिणाम होणार आहे.
जवानाचा मृत्यू
जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील एका छावणीत मंगळवारी सर्व्हिस रायफलमधून गोळी सुटल्याने ‘सीआरपीएफ’ जवानाचा मृत्यू झाला. सांबा येथील रहिवासी असलेले कॉन्स्टेबल अब्दुल गनी हे पूंछ शहरात पहारा देत असताना त्यांच्याच सर्व्हिस रायफलमधून गोळी लागून गंभीर जखमी झाले. घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू केली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘टपाली मते पुन्हा मोजा’
बेंगळुरू : कर्नाटक उच्च न्यायालयाने २०२३च्या निवडणुकीदरम्यान शृंगेरी विधानसभा मतदारसंघात मतदान झालेल्या २७९ टपाल मतपत्रिकांची पुन्हा पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. फेरपडताळणीच्या निकालानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना टपाल मतपत्रिकांची फेरमोजणी करून निकाल जाहीर करावा लागणार आहे. भाजपचे पराभूत उमेदवार डी. एन. जीवराज यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती आर. नटराज यांनी सोमवारी हा आदेश दिला.








