कृतघ्न मुलाने काँग्रेसबद्दल बोलू नये

Contributed byम.टा.खास प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी पार्थ पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. पार्थ पवार यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेला पक्षानेही 'एक्स'वरून उत्तर दिले. दबावतंत्राने प्रश्न सुटणार नाहीत, असे पटोले म्हणाले. पार्थ पवार यांनी काँग्रेसच्या 'डाऊनफॉल'बद्दल केलेल्या वक्तव्यावर अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कृतघ्न मुलाने काँग्रेसबद्दल बोलू नये, असे पक्षाने म्हटले आहे.

कृतघ्न मुलाने काँग्रेसबद्दल बोलू नये

दबावतंत्राचा वापर करून आणि काँग्रेसवर टीका करून प्रश्न सुटणार नाही. पार्थ पवार हे आमच्या पेक्षा वयाने लहान आहेत. त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्याचे काही कारण नाही. कुणाचा डाऊनफॉल होईल हे काळच सांगेल. त्यांच्यावर मला प्रतिक्रिया द्यायची नाही अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी पार्थ पवार यांना सुनावले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्थ पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर केलेल्या टीकेला काँग्रेसने मंगळवारी प्रत्युत्तर दिले. ‘धड भाषण देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पूर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेसच्या ‘डाऊनफॉल’बद्दल बोलणे, जरा जास्तच नाही का? महाशक्तिपुढे गुडघे टेकलेल्या या कृतघ्न मुलाने काँग्रेसबद्दल न बोललेलेच बरे’, अशी टीका पक्षाच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवरून करण्यात आली.

बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत असताना काँग्रेसने तिथे उमेदवार दिला. यावरून नाराज होत पार्थ यांनी काँग्रेसचा आता डाऊनफॉल अर्थात पडता काळ सुरू झाला असल्याची टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसनेही ‘एक्स’वरून पार्थ यांना सुनावले आहे. ‘जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या आणि महाशक्तिसमोर आत्मसमर्पण केलेल्या या कृतघ्न मुलाने काँग्रेसबद्दल बोलू नये’, असे पक्षाने म्हटले आहे.

‘या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यात एफआयआर नोंद करून घेतला, तिथे काँग्रेसचे सरकार आहे. महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, मग निवडणुकीतून माघार घेईन, असे सांगत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे’, अशी टीकाही या पोस्टमध्ये करण्यात आली आहे.