प्रस्थापितांना पराभवाचे धक्के देत वाटचाल करण्याची मालिका आयुष शेट्टी याने शुक्रवारीही कायम राखली. त्याने जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या जोनाथन ख्रिस्ती (इंडोनेशिया) यांचे कडवे आव्हान २३-२१, २१-१७ असे मोडून काढत आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. यासह त्याने पदकही निश्चित केले.
आज, शनिवारी रंगणाऱ्या उपांत्य फेरीत आयुषचा सामना अव्वल मानांकित कुनलावुत वितिदसर्ण (थायलंड) यांच्याशी होईल. माजी जगज्जेता कुनलावुत हा ऑलिम्पिक रौप्यपदक विजेताही आहे.
आपल्या जोरकस स्मॅशने आयुषने उपांत्य फेरीत जोनाथनला जेरीस आणले. विशेष म्हणजे उपांत्य फेरीपर्यंतच्या वाटचालीत आयुषने अद्याप एकही गेम गमावलेला नाही. आय़ुष आणि जोनाथन प्रथमच आमने-सामने आले होते. मात्र तरीही आयुषची तयारी परीपूर्ण होती. याचे बरेचसे श्रेय आयुषचे प्रशिक्षक इरवानस्याह आदी प्रतामा याच्या रणनीतीलाही द्यायला हवे. इरवानस्याह यांनी याआधी जोनाथनच्या प्रशिक्षकाची भूमिका निभावली आहे. त्यामुळे त्याच्या खेळातील बारकावे प्रशिक्षक म्हणून इरवानस्याह यांना निश्चितच माहिती होते.
ऐन कोर्टवर झालेल्या सफाईदार कामगिरीचे श्रेय मात्र आयुषचेच. त्याचा प्रत्येक फटका चोख अन् शिस्तबद्ध होता.
लक्षवेधक
आयुष जागतिक क्रमवारीत २५वा, तर ख्रिस्ती चौथा
स्पर्धेत लि शेंग फेंग (जागतिक क्रमवारीत सातवा) आणि चि यू जेन (जागतिक क्रमवारीत २०वा) यांना पराभवाची धूळ चारली आहे








