टेंटुलिया (पश्चिम बंगाल) : ‘आसाममध्ये गुरुवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीत नागरिकांच्या मतांवर विजयाची खात्री नसल्याने भाजपने उत्तर प्रदेशातून ५० हजार जणांना रेल्वेतून आणले होते’, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी केला. केंद्रातील भाजप सरकारच्या काळात देशातील कोणतीही यंत्रणा तटस्थ नाही. कारण या पक्षाने सर्वांनाच विकत घेतले आहे', असा गंभीर आरोपही त्यांनी उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील टेंटुलिया येथे निवडणूक सभेत केला.
भाजपने बहुचर्चित पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी आपले संकल्पपत्र अर्थात, जाहीरनामा प्रसिद्ध केला. सत्तेत आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत समान नागरी कायदा ( यूसीसी ) लागू करणे, राज्यातील घुसखोरी रोखण्यासह महिला, युवक, शेतकरी व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी व्यापक कल्याणकारी योजनांच्या आश्वासनांची खैरात यामध्ये करण्यात आली आहे.
हा जाहीरनामा ‘सोनार बांगला’चा पथदर्शी आराखडा असल्याचे वर्णन त्याच्या प्रकाशनावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले; तसेच राज्यातील सत्ताधारी तृणमूल सरकारवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. ‘तृणमूल काँग्रेसच्या गेल्या १५ वर्षांच्या राजवटीत राज्यातील जनतेला ‘दुःस्वप्न’ भोगावे लागले,’ अशी टीका त्यांनी केली.
राज्याच्या सीमा सुरक्षित करणे, गुरांची तस्करी रोखणे आणि सरकारी जमिनी अतिक्रमण व घुसखोरांपासून मुक्त करण्याचे आश्वासन पक्षाने जाहीरनाम्यात दिले आहे. ‘अनेक भाजपशासित राज्यांमध्ये ‘यूसीसी’ लागू करण्यात आला आहे. प्रत्येक नागरिकासाठी एकच कायदा असावा, यासाठी आम्ही सहा महिन्यांत बंगालमध्ये तो लागू करू,’ असे शहा यांनी नमूद केले. अल्पसंख्याकांकडून होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर, ‘भाजप प्रत्येक नागरिकाला आपला धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य हमी देणारा कायदाही करील,’ असे आश्वासन त्यांनी दिले.
जाहीरनाम्यात बेरोजगार युवक आणि सरकारी कर्मचाऱ्यांमधील असंतोषाचा फायदा घेण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. त्यासाठी बेरोजगार युवकांना दरमहा तीन हजार रुपये भत्ता आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अतिरिक्त १५ हजार रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये महागाई भत्त्यावरून दीर्घकाळापासून असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर त्यांना केंद्राच्या बरोबरीने महागाई भत्ता आणि पदभार स्वीकारल्यानंतर ४५ दिवसांत सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी; तसेच शेतकऱ्यांसाठी भाजपने पीएम-किसान योजनेअंतर्गत वार्षिक नऊ हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने सत्तेत आल्यास महिलांना दरमहा तीन हजार रुपये, पोलिस दलासह सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण आणि सार्वजनिक वाहनांमध्ये मोफत प्रवासाचे आश्वासन यात देण्यात आले आहे.
समान नागरी कायदा, मुख्यमंत्रिपदी बंगालचा सुपुत्र आणि राज्यात ‘रामराज्य,’ अशा त्रिसूत्रीची घोषणा अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत केला. बंगालमध्ये ५ मेपासून भाजप सत्तेत असेल. आम्ही इथे रामराज्य अर्थात, सुशासन प्रस्थापित करू,’ असे शहा म्हणाले.








