लखनौ : उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे झालेल्या ॲसिड हल्ल्यातील २३ वर्षीय तरुणी काजल यादव हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तिची ५८वर्षीय आई लीलावती देवी यांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रामकोला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोरवान परिसरात गुरुवारी रात्री ही घटना घडली. पदवीधर असलेली काजल आई-वडील, धाकटा भाऊ आणि एक पुतण्या यांच्यासोबत राहत होती. तिचे वडील प्रभुनाथ यादव पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे शीतगृहात काम करत होते आणि सेवानिवृत्तीनंतर सुमारे सहा महिन्यांपूर्वी घरी परतले होते. गुरुवारी मध्यरात्रीनंतर एका अज्ञात हल्लेखोराने छतावरून घरात प्रवेश केला आणि झोपलेल्या लीलावती व तिची मुलगी काजल यांच्यावर ॲसिड ओतले. यात ती गंभीर जखमी झाली.








