हेरगिरीचे जाळे उद्ध्वस्त; ११ अटकेत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने पाकिस्तानशी जोडलेले मोठे हेरगिरीचे जाळे उध्वस्त केले आहे. या कारवाईत ११ जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी लष्करी ठिकाणांवर गुप्तपणे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. या कॅमेऱ्यांच्या मदतीने पाकिस्तानमधील सूत्रधार भारतीय सैनिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. बनावट सिमकार्डचा वापर करून हे फुटेज पाकिस्तानमध्ये पाहिले जात होते.

delhi police dismantles espionage network 11 arrested

आरोपींनी सीसीटीव्ही बसवण्यापूर्वी सविस्तर टेहळणी केली होती. लष्करी छावण्या, सीमावर्ती रस्ते, तसेच सुरक्षा दलांच्या हालचालींच्या मार्गांवर स्पष्ट नजर ठेवता येईल, अशा ठिकाणांची काळजीपूर्वक निवड केली होती. सीसीटीव्ही फूटेजचे पाकिस्तानमधील सूत्रधारांकडून विश्लेषण केले जात होते. त्यातून पुढील कारवायांचे नियोजन केले जात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली

पाकिस्तानशी थेट जोडलेले हेरगिरीचे जाळे दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने उद्ध्वस्त केले. या कारवाईत ११ जणांना अटक करण्यात आली आहे. आयएसआयचे पाठबळ असलेल्या या हस्तकांनी उत्तर भारतातील लष्कराची महत्त्वाची ठिकाणे; तसेच सीमेजवळ सौरऊर्जेवर चालणारे सीसीटीव्ही कॅमेरे गुप्तपणे बसवले. या कॅमेऱ्यांच्या थेट प्रक्षेपणाद्वारे पाकिस्तानमधील सूत्रधार भारतीय जवानांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते, अशी माहिती एका अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली.

पंजाबमधील कपूरथळा, जालंधर, पठाणकोट, पतियाळा, मोगा, हरियाणातील अंबाला, जम्मू-काश्मीरमधील कथुआ; तसेच राजस्थानमधील बिकानेर आणि अलवर येथे हे कॅमेरे बसवण्यात आले होते. लष्करी तळ, आंतरराष्ट्रीय सीमा, सैनिकांच्या हालचाली आणि सीमेशी निगडित महत्त्वाच्या पायाभूत सुविधा या दृष्टीने ही ठिकाणे महत्त्वाची आहेत. यामुळे तेथील दृश्य टिपण्यासाठी ही ठिकाणे निवडण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने दोन टप्प्यांत ही कारवाई केली. पहिल्या टप्प्यात पंजाब व दिल्ली येथून सहा जणांना अटक करून नऊ सीसीटीव्ही कॅमेरे, चार पिस्तुले आणि २४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात आणखी पाच जणांना अटक करण्यात आली.

‘बनावट ओळखपत्रांवर घेतलेल्या सिमकार्डचा वापर या सीसीटीव्हींमध्ये करण्यात आला होता. ते मोबाइल ॲप्लिकेशनला जोडल्याने त्याद्वारे चित्रित केलेले फूटेज त्याच वेळी पाकिस्तानमध्ये पाहणे शक्य झाले होते,’ असे पोलिसांनीसांगितले.