लेबनॉनमध्ये युद्धविराम लागू असल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केला होता. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. नेतान्याहू यांनी स्पष्ट केले, की लेबनॉनमध्ये कोणताही युद्धविराम झालेला नाही. जोपर्यंत आमच्या नागरिकांची सुरक्षा पूर्णपणे सुनिश्चित होत नाही, तोपर्यंत हिज्बुल्लावर पूर्ण ताकदीने लष्करी हल्ले सुरूच राहतील, असा पुनरुच्चार नेतान्याहू यांनी केला आहे.
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी इस्रायलविरोधात केलेल्या अत्यंत प्रक्षोभक आणि अपमानजनक वक्तव्याचा इस्रायलने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या विधानांमुळे शांतता प्रक्रियेत तटस्थ मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर इस्रायलने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
इस्रायलच्या पंतप्रधानांच्या कार्यालयाने ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे, की ‘इस्रायलचा नायनाट करण्याचे पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचे आवाहन संतापजनक आहे. शांततेसाठी तटस्थ मध्यस्थ असल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही सरकारकडून असे विधान खपवून घेतले जाणार नाही.’
आसिफ यांचे प्रक्षोभक विधान
पाकिस्तान सध्या अमेरिका आणि इराण यांच्यातील दोन आठवड्यांच्या तात्पुरत्या युद्धविरामासाठी मध्यस्थी करीत असून, या आठवड्यात इस्लामाबादमध्ये शांतता चर्चा आयोजित करण्याची तयारी सुरू आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर ख्वाजा आसिफ यांनी समाजमाध्यमावर इस्रायलला ‘दुष्ट’ आणि ‘मानवतेसाठी शाप’ संबोधले. ‘इस्रायलची निर्मिती करणाऱ्यांना नरकात जागा मिळेल,’ असे म्हणत त्यांनी इस्रायलचा उल्लेख ‘कॅन्सर’ असा केला. ‘इस्लामाबादमध्ये शांतता चर्चा सुरू असताना लेबनॉनमध्ये नरसंहार केला जात आहे. आधी गाझा, मग इराण आणि आता लेबनॉनमध्ये इस्रायलकडून निष्पाप नागरिकांची हत्या सुरू आहे,’ असा आरोपही आसिफ यांनी केला.








