कबड्डीचा दम घूमत असलेल्या तबेला मैदानाचा हिरक महोत्सव हा प्रत्येक कबड्डीप्रेमीसाठी आनंद सोहळाच आहे. कबड्डीचा दम घुमलेल्या श्रमिक जिमखान्यात होणाऱ्या या सोहळ्याच्या वेळी दिग्गज कबड्डी खेळाडूंसह खेळाच्या प्रेमाखातर झटलेल्या कार्यकर्त्यांचाही गौरव होईल.
अर्जुन पुरस्कार विजेत्यांच्या गौरवाबरोबरच कसलीही मदत न घेता चुन्याची रेघ मारणारे अशोक गुरव, स्पर्धा आयोजनासाठी साह्य करणारे दत्ता देवघरे यासह अनेकांचा सन्मान होईल. यावेळी श्रमिक जिमखान्याचे पूजन होईल. कार्यक्रमास येणाऱ्यांच्या हातावर पूर्वीच्या स्पर्धेची आठवण म्हणून शिक्का मारण्यात येईल. हेच पूर्वीच्या कबड्डी सामन्यांचे तिकीट असे. त्याचबरोबर कबड्डी प्रेमींना जुनी आठवण म्हणून लिंबाच्या गोळ्याही देण्यात येतील. विशेष म्हणजे कबड्डीच्या खेळाडू, कार्यकर्ते आणि संघटकांच्या घामाने पावन झालेल्या मातीचा कलश कबड्डीच्या दिग्गजांना आठवण म्हणून दिला जाणार आहे.








