राजस्थानमधील झुनझुनू हे शहर तेथील शूर सैनिंकासाठी प्रसिद्ध. तिथे क्रिकेटचे बाळकडू गिरवलेला मुकुल चौधरीच्या लढवय्या फलंदाजीचे कौतुक होते. त्याच्या झुंजार अर्धशतकामुळे लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल टी-२० क्रिकेटमध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध विजय मिळवला.
मुकुलने आक्रमण सुरू केले, त्यावेळी तो फरकच कमी करणार असे वाटत होते. मात्र अखेरच्या दोन षटकांत तीस धावांची गरज असताना त्याने संघास अविश्वसनीय विजय मिळवून दिला. ‘मी जिथे वाढलो, त्या मातीतच लढाऊ बाणा आहे. मी हे मैदानात दाखवले. जवान हीच वृत्ती देशाच्या सीमेवर दाखवत आहेत,’ या त्याच्या टिपणीने सर्वांचे मन जिंकले.
मुकुलचा प्रवास धक्कादायक होता. ‘अगदी खरे सांगायचे तर माझ्या जन्मापूर्वीच माझा क्रिकेट प्रवास सुरू झाला होता. माझ्या वडिलांचा विवाह झाला त्यावेळीच त्यांनी आपला मुलगा क्रिकेटपटू होणार हे स्वप्न पाहिले होते. प्रतिकुल आर्थिक परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही. मी खेळायला सुरुवात केली. त्यावेळी अकादमीही नव्हत्या’ मुकुल सांगत होता. सुरुवातीस वडिलांनी त्याला सिकर येथील एसबीएस क्रिकेट अकादमीत दाखल केले. त्यानंतर तो जयपूरला गेला. तेथून वडिलांनी त्याला दिल्लीत पाठवले. आपला मुलगा दिल्लीत खेळला तरच त्याला संधी मिळेल हा त्यांचा विश्वास खरा ठरला.
मोहम्मद शमी बाद झाला, त्यावेळी मुकुलच्या साथीला केवळ अवेश खान होता. मुकुल आणि अवेशने २४ चेंडूंत ५४ धावांची भागीदारी केली. त्यात मुकुलने २१ चेंड़ूंत ५२ धावांचा चोप दिला होता. त्याने दोन चौकार आणि सात षटकारांची आतषबाजी केली होती. ‘ दडपण तर होतेच, पण दैवाने आपल्याला काहीतरी दाखवून देण्याची संधी दिली आहे, असाच विचार मी केला. त्यामुळे दडपण वाटले नाही,’ मुकुल अवघड गोष्ट सोपी करीत होता.
अखेरच्या चेंडूपर्यंत खेळलो तर नक्कीच जिंकू असा विश्वास होता. मी प्रत्येक चेंडू कसा फटकावता येईल याकडे लक्ष दिले. अजून काय सांगू, जे घडायचे होते, ते घडले, मुकुलने सर्वांचे मन जिंकले होते.








