वॉशिंग्टन : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो पुढील महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. अमेरिकेच्या दौऱ्यावर असणारे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी गुरुवारी रुबियो यांची भेट घेतली. उभय देशांतील व्यापार संबंध , क्वाड परिषद यावर झालेल्या फलदायी चर्चेनंतर रुबियो यांच्या आगामी भारत दौऱ्याची घोषणा करण्यात आली.
मिस्री हे अमेरिकेच्या तीनदिवसीय दौऱ्यावर असून गुरुवारी त्यांनी व्हाइट हाउसमध्ये रुबियो यांची भेट घेतली. या बैठकीत द्विपक्षीय संबंध, व्यापार, महत्त्वाची खनिजे, संरक्षणक्षेत्र, क्वाड आदी विविध विषयांवर विस्तृत चर्चा झाली. अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर या वेळी उपस्थित होते. गोर यांनीच रुबियो यांच्या आगामी भारत दौऱ्याची घोषणा केली. रुबियो यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून मिस्रींसोबतच्या भेटीबाबत समाधान व्यक्त केले.
मिस्री यांनी या दौऱ्यात अमेरिकेची तपास संस्था ‘एफबीआय’चे संचालक काश पटेल यांचीही भेट घेतली.








