‘अटल’वरून आत्महत्या; मृत्यूचा दाखला कुणाकडून?

महाराष्ट्र टाइम्स

अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या श्रीनिवास करुतुरी यांच्या मृत्यूचा दाखला मिळण्यास पावणे दोन वर्षे लागली. उरण, नवी मुंबई आणि पनवेल महापालिकांनी हद्दीचा वाद घातल्याने दाखला मिळाला नाही. अखेर पत्नी सुनयना करुतुरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी लवकरच सुनावणी अपेक्षित आहे.

‘अटल’वरून आत्महत्या; मृत्यूचा दाखला कुणाकडून?
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

देशातील सर्वाधिक लांबीच्या शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे १२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर सुसाट प्रवासाच्या सोयीबद्दल हा सेतू चांगलाच चर्चेत आला. मात्र काही महिन्यांनी एका व्यक्तीने या सेतूवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना घडली. आता ती घटना पुन्हा चर्चेत आली आहे. आत्महत्या केलेल्या नागरिकाच्या मृत्यूचा दाखला हद्दीच्या वादावरून तब्बल पावणे दोन वर्षे मिळू शकला नसल्याने त्याच्या पत्नीला त्यासाठी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे!

उरण नगरपालिका , नवी मुंबई महापालिका व पनवेल महापालिकेनेही संबंधित मृत्यू हा आपल्या हद्दीत झाला नसल्याचे म्हणत मृत्यूचा दाखला देण्याविषयी हात वर केल्याने सुनयना करुतुरी यांनी ॲड. जमिल खान यांच्यामार्फत रिट याचिका केली आहे. याविषयी न्या. रवींद्र घुगे व न्या. हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठासमोर या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

सुनयना यांच्या याचिकेनुसार, त्यांचे पती श्रीनिवास करुतुरी हे २३ जुलै २०२४ रोजी डोंबिवलीतील निवासस्थानाहून गाडीने निघाले होते. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांची गाडी अटल सेतूवर बेवारस अवस्थेत आढळली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, श्रीनिवास यांनी पुलावरून खाली पाण्यात उडी मारल्याचे दिसले. आत्महत्येच्या या घटनेनंतर सुनयना यांनी श्रीनिवास यांच्या मृत्यूचा दाखला मिळण्यासाठी प्रथम उरण नगरपालिकेत अर्ज दिला. मात्र, ‘ज्या ठिकाणी घटना घडली तो भाग आमच्या हद्दीत येत नाही,’ असे कारण देत त्या नगरपालिकेने नकार दिला. त्यानंतर नवी मुंबई महापालिका व पनवेल महापालिकेकडूनही त्यांना तसेच उत्तर मिळाले. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना ही याचिका करावी लागली आहे.