कोकणातील शेतकऱ्यांच्या आमराईतील अस्सल हापूस आंब्यांची चव यंदाही ठाणेकरांना चाखता येणार आहे. निमित्त आहे, संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित १९ व्या आंबा महोत्सवाचे. यंदा १ ते १० मे या कालावधीत गावदेवी मैदानात हा महोत्सव होणार असून 'शेतकरी ते ग्राहक' असा थेट अस्सल आंबा या माध्यमातून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.
मागील ११ वर्षांपासून कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात आहे. अशा परिस्थितीचा ठाणेकर सहानुभूतीने विचार करेल आणि आंबा महोत्सवात खरेदी करून शेतकऱ्यांना पाठबळ देईल, असा विश्वास या महोत्सवाचे आयोजक व आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. महोत्सवात हापूस, पायरी, रत्ना, केसर आंब्याबरोबरच, आंबा-फणस पोळी, सरबते, काजू, मालवणी मसाले, पापड, पोहे, अशा विविध उत्पादनांचे ४५ स्टॉल असतील.








