‘अंत्योदय’मधील कुटुंबांना मोफत साड्या

महाराष्ट्र टाइम्स

राज्यातील अंत्योदय योजनेतील पात्र कुटुंबांना आता दरवर्षी एक साडी मोफत मिळणार आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने हा निर्णय घेतला आहे. या योजनेतून ठाणे जिल्ह्यातील ४८ हजार ७०४ कुटुंबांना लाभ मिळेल. पुढील वर्षी श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर कापडी पिशवीसह साड्यांचे वाटप होणार आहे. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ या वितरणाची जबाबदारी सांभाळणार आहे. ई-पॉस यंत्रणेद्वारे साड्यांचे वितरण केले जाईल.

‘अंत्योदय’मधील कुटुंबांना मोफत साड्या
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

राज्यातील अंत्योदय योजनेतील पात्र कुटुंबांना आता दरवर्षी एक साडी मोफत दिली जाणार आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या निर्णयानुसार सुरू करण्यात आलेल्या या योजनेतून ठाणे जिल्ह्यातील ४८ हजार ७०४ कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळेल. अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड आणि शहापूर तालुक्यांत ही लाभार्थी कुटुंबे आहेत.

सरकारने या योजनेच्या वितरणासाठी पुढील वर्षी होणाऱ्या श्रीराम नवमीचा मुहूर्त निश्चित केला असून, कापडी पिशवीसह या साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाची ‘नोडल एजन्सी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, महामंडळाकडून तालुक्यातील गोदामांपर्यंत साड्यांचा पुरवठा केला जात आहे. शहापूर तालुक्यात सर्वाधिक १८ हजार २६८ साड्यांचे वाटप होणार आहे. त्यापाठोपाठ मुरबाडमध्ये ११ हजार २२१, भिवंडीत ११ हजार ४७४, अंबरनाथमध्ये ४ हजार ८४ आणि कल्याण तालुक्यात २ हजार ८८१ साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त भिवंडीतील अतिरिक्त ७७६ कुटुंबांसाठी साड्यांची तरतूद करण्यात आली आहे. साड्यांच्या वितरणासाठी ‘ई-पॉस’ यंत्रणेचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.