गगन विहार कॉम्प्लेक्सचा सर्वात मोठा लौकिक म्हणजे ही एक ‘ तंटामुक्त सोसायटी ’ आहे. संकुलात कोणतीही समस्या उद्भवली, तरी येथील नागरिक ती वादाऐवजी संवादाने सोडवण्यावर भर देतात. पावसाळ्यात संकुलाच्या आवारात साचणारे पाणी असो किंवा पाणीपुरवठ्यातील तांत्रिक बिघाड, संपूर्ण संकुल एकत्र येऊन या समस्यांवर मात करते. ही एकजूटच या संकुलाचे खरे वैभव आहे. संकुलातील मोठ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि सुसूत्रता राखण्यासाठी ‘ गगन विहार फेडरेशन ’ची स्थापना करण्यात आली आहे. फेडरेशनचे अध्यक्ष कृष्णराव मानकर आणि सचिव विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संकुलाचा कारभार अत्यंत पारदर्शकपणे चालतो. नागरिकांच्या सुख-दु:खात सहभागी होण्यासोबतच, संकुलाच्या हिताचे निर्णय घेण्यास हे नेतृत्व नेहमीच अग्रेसर असते.








