कोपरीत रात्रभरवीजपुरवठा ठप्प

महाराष्ट्र टाइम्स

कोपरी परिसरात ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे नागरिकांना, विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना उकाड्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक भागांमध्ये तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. काही ठिकाणी लवकर वीजपुरवठा पूर्ववत झाला, तर काही ठिकाणी पहाटेपर्यंत नागरिकांना प्रतीक्षा करावी लागली.

power supply disrupted in kopri area residents suffer and demand immediate repairs

कोपरी परिसरात ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यामुळे रविवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत विद्युतपुरवठा खंडित झाला. रात्री सुमारे १ वाजल्यापासून पहाटे ६ वाजेपर्यंत अनेक भागांमध्ये वीज नसल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. एप्रिलच्या उकाड्यामुळे आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांना वीज नसल्याने रात्र जागून काढावी लागली.

लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांचे उष्णतेमुळे हाल झाले. अनेक रहिवाशांनी सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त करत तत्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. काही भागांमध्ये तांत्रिक पथकाने जलद हालचाली करत दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने १ ते २ तासांत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. मात्र, काही ठिकाणी दुरुस्तीला अधिक वेळ लागल्याने नागरिकांना पहाटेपर्यंत प्रतीक्षा करावी लागली.