अमरावतीला अमली पदार्थमुक्त करून अधिक सुरक्षित करण्यात येईल. गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे उभारण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली.
अमरावती शहरासोबतच ग्रामीण भागात अवैध धंद्यांना थारा नाही. पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षकांसोबत यासंदर्भात चर्चा करणार आहे. खात्यातील काही कर्मचाऱ्यांच्या सहभागाशिवाय अवैध धंदे शक्य नाहीत. त्यांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसच्या खासदारांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी अमरावती जिल्हा दौऱ्यावर आलेल्या बावनकुळे यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. एकीकडे संपूर्ण जग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मान्यता देत असताना, संसदेच्या लोकमंदिरात अशाप्रकारचे प्रदर्शन करणे लोकशाहीला मान्य नाही. लोकशाहीत अशा बाबींना स्थान नाही. हे अत्यंत वाईट वर्तन आहे. काँग्रेस पक्षाची सध्याची लक्षणे अत्यंत वाईट आहेत. त्यांच्या वागण्यातून ते ‘मेंटली रिटायर्ड’ झाल्यासारखे वाटतात. त्यांच्या बुद्धीची कीव येते. देशातील जनतेने आधीच काँग्रेसला झिडकारले असून, अशीच भूमिका राहिली तर पुढील काळात काँग्रेस देशातून हद्दपार होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याचा लाभ अमरावती जिल्ह्यालाही झाला. प्रत्येक अर्थसंकल्पात अमरावतीसाठी भरीव निधी दिल्यामुळे जिल्ह्यात विकासकामे मार्गी लागली, असे बावनकुळे म्हणाले. महापालिका निवडणुकीदरम्यान ९ जानेवारी रोजी अमरावतीत झालेली अजित पवार यांची अखेरची प्रचारसभा आठवत त्यांनी सांगितले की, शहराचा झपाट्याने विकास करण्यासाठी दादांनी निधीचे आश्वासन दिले होते. आज ते हयात नसले तरी अमरावतीकरांना दिलेला प्रत्येक शब्द महायुती सरकार पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी दिला.
दरम्यान, बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके आणि संजय खोडके यांच्या निवास्थानी भेट दिली.









