पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी बहुप्रतीक्षित अशा बोर घाटातील ‘ मिसिंग लिंक ’चे काम अखेर पूर्णत्वास गेले आहे. अत्यंत आव्हानात्मक अशा ‘ केबल ब्रिज ’चे सर्व काम नुकतेच पूर्ण झाले असून, राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) पुढील काही दिवसांत पुलाच्या क्षमतेच्या विविध चाचण्या घेण्यात येणार आहेत.
पुलाच्या क्षमतेच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग खुला केला जाणार असून, महाराष्ट्र दिनापासूनच नागरिकांना त्याचा वापर करता येण्याची चिन्हे आहेत.
घाटातील कोंडी दूर होणार
पुणे-मुंबई दरम्यानच्या द्रुतगती महामार्गावर (एक्स्प्रेस-वे) घाटात होणारी कोंडी दूर करण्याच्या दृष्टीने द्रुतगती महामार्ग क्षमता वाढ प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले होते. त्यामध्ये बोगदे आणि ‘केबल स्टेड’ स्वरूपाचा दरी पूल उभारण्यास मान्यता देण्यात आली होती. २०१९पासून हे काम सुरू असले, तरी त्यात अनेक अडचणी आल्याने ते पूर्ण होण्यास अधिक वेळ गेला. गेल्या चार महिन्यांत अत्यंत वेगाने हे काम पूर्ण करण्यात आले असून, नुकतेच या प्रकल्पासाठी दरीपुलाचे संपूर्ण काम पूर्णत्वास गेले असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.









