मराठवाडा मित्र मंडळाच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयात ‘एक संवाद’ या उपक्रमांत प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांची मुलाखत रंगली. कलाप्रवासातील अनुभव, चित्रकलेतील बदलते प्रवाह आणि कला व समाज यांतील नाते यावर कामत यांनी दिलखुलासपणे विचार मांडले.
प्रा. डॉ. प्रतीक सलगर यांनी घेतलेल्या या मुलाखतीत कामत यांनी आपल्या जीवनातील विविध टप्प्यांतील आठवणी सांगून, चित्रकलेच्या प्रवासाचे अनेक पैलू उलगडून दाखवले. उपस्थितांना चित्रे दाखवून, त्या चित्रांमागील विचार आणि सर्जनाची प्रक्रिया सांगितली. किस्से, प्रत्येक चित्रामागील कथा त्यांनी ओघवत्या भाषेत कथन केले. ‘सृजन’ या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले. मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, प्राचार्या डॉ. क्रांती देशमुख उपस्थित होते. डॉ. सौरभ उबाळे यांनी आभार मानले.










