जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या प्रभावशाली सहा महिलांचा श्री गणेश सभेच्या वतीने श्री वरद गणेश मंदिरात नुकताच सत्कार करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत स्त्रीरोगतज्ज्ञ व लेखिका डॉ. उर्मिला चाकूरकर, नगरसेविका कीर्ती शिंदे, सीमा साळवे, श्रीमद भगवतगीतेच्या अभ्यासक अरुणा कुलकर्णी, मुक्त पत्रकार डॉ. आरतीश्यामल जोशी, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या माजी कोषाध्यक्ष सविता दिवाकर कुलकर्णी यांचा विश्वस्त निर्मला तरटे, सभासद निशा छापेकर, उषा देशपांडे यांच्या हस्ते सत्कार झाला. या प्रसंगी डॉ. चाकूरकर यांनी महिलांमधील कर्करोगाविषयी विस्तृत माहिती दिली. तर, स्वत:चे कल्याण निष्काम कर्मयोगाच्या सिद्धांताद्वारे करुन घेता येऊ शकते, याकडे अरुणा कुलकर्णी यांनी लक्ष वेधले. तसेच महिलांनी सामाजिक रुढी परंपरांच्या जोचक जोखडातून मुक्त व्हावे, असे आवाहन आहारतज्ज्ञ रसिका देशमुख यांनी केले. याच कार्यक्रमात संस्थेत दीर्घ काळापासून सेवा देणाऱ्या शुभांगी घाटे, जया नगराळे, पार्वती शेजूळ, हेमांगिनी कट्टी, जया सोनवणे यांचाही संस्थेच्या विश्वस्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वृषाली श्रीकांत यांनी सूत्रसंचालन केले. पाहुण्यांचा परिचय निशा छापेकर यांनी करुन दिला, तर उषा देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सुनिल खोचे, सचिव अरविंद तेलवाडकर, कोषाध्यक्ष अनिल वाळुजकर तसेच कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.









