कामगार नाट्य स्पर्धेत शनिवार, १४ मार्च रोजी ‘ऑपरेशन गंगा’ नाटकाचा प्रयोग होईल. तर रविवारी ‘टेडी बिअर’ या नाटकाने स्पर्धेचा समारोप होणार आहे. रसिकांसाठी प्रवेश खुला असून नाटकांचा आनंद घ्यावा, असे आवाहन कामगार कल्याण केंद्राने केले आहे.
कामगार नाट्य स्पर्धेतील वैविध्यपूर्ण नाटकांना रसिकांचा भरभरुन प्रतिसाद आहे. स्पर्धेत १८ प्रयोग आहेत. नवीन संहिता, तंत्राने रसिकांचे लक्ष वेधले आहे.
स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत अठरा नाट्य संघांनी सहभाग घेतला आहे. या ७१ व्या नाट्य स्पर्धेत दररोज सायंकाळी ललित कला भवन, उस्मानपुरा येथे नाट्य प्रयोग सुरू आहेत. कामगार कल्याण केंद्र उदगीर यांनी सुरेश खरे लिखित व सुवर्णा बुरांडे दिग्दर्शित ‘संकेत मिलनाचे’ हे वैचारिक आणि प्रबोधनात्मक नाटक तरल प्रेमकथेतून सादर केले. आजच्या धकाधकीच्या, आंग्ल संकल्पनांनी व्यापलेल्या काळातही नितीमूल्ये, प्रेमातील पवित्रता, मनाचे कोवळेपण आणि नात्यांची शुचिता यावर भाष्य करणाऱ्या नाटकांचा प्रयोग रंगला. लोकप्रिय लेखक पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यावर आधारीत ‘अस्वस्थ वल्ली’ या नाटकाने धमाल उडवली. भाईंच्या १०६ व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी निर्माण केलेली सात पात्रे आपल्या निर्मात्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट स्वर्गात जातात. कल्पनेला वास्तवाचे भान ठेवून दिग्दर्शन करण्यात आले होते. कामगार कल्याण केंद्र, देगलूर निर्मित या नाटकाचे लेखन-दिग्दर्सन विनोद डावरे यांनी केले होते. सतीश बोरा लिखित 'हिरण्यकश्यप' नाटक सामाजिक विषयामुळे लक्षवेधी ठरले. परंपरेचा अभिमान आणि आधुनिकतेचे आव्हान यांचा मेळ घालणारे नाटक रसिकांना भारावून टाकणारे ठरले. या नाटकाचे दिग्दर्शन हेमलता धामुणे यांनी केले होते. भानुदास शेवाळे लिखित व सुनील बनसोड दिग्दर्शित ‘मृत्युंजय : एक आस’, कामगार कल्याण केंद्र सहारा उपकेंद्राचे ‘चल ऐश कर ले’ नाटक दाद घेऊन गेले. डॉ. विजय देशमुख लिखित व श्रीपाद पदे दिग्दर्शित या नाटकातून वर्तमानावर भाष्य करण्यात आले. तृतीयपंथीयांचे भावविश्व रंगमंचावर मांडणारे ‘ती’ नाटकही लक्षवेधी ठरले.









