‘शेतकऱ्यांपासून महिलांच्या सक्षमीकरणापर्यंत, तरुणांच्या रोजगारापासून ज्येष्ठांच्या सन्मानापर्यंत विकासाचा प्रत्येक मुद्दा आम्ही गांभीर्याने हाताळलेला आहे. मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचाही माणूस आहे. दिलेला शब्द पाळणे ही माझी ओळख आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना साथ द्या. स्वच्छ, कार्यक्षम आणि लोकाभिमुख कारभारासाठी आम्हाला संधी द्या. तुमच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही, विकासकामांसाठी कधीच निधी कमी पडू देणार नाही, हा माझा शब्द आहे...,’ असे मतदारांना आवाहन करणारा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अखेरचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुरुवारी प्रसिद्ध केला.
राज्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. बारामती येथे विमानाने जात असताना अजित पवार यांचे निधन झाले. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांत राष्ट्रवादीला मतदान करण्यासाठी आवाहन करणारा त्यांचा अखेरचा व्हिडिओ पक्षाने गुरुवारी प्रसिद्ध केला.
पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी हा व्हिडिओ संदेश २४ जानेवारी रोजी चित्रित करण्यात आल्याचे पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सांगितले. हा व्हिडिओ एआयच्या माध्यमातून बनवलेला नव्हे, तर खराखुरा असल्याचेही पक्षाने स्पष्ट केले आहे.
‘जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाची खरी किल्ली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच ग्रामीण भागाला केंद्रस्थानी ठेवून काम केले आहे. पाणीपुरवठा असो, रस्त्याची कामे असो, आरोग्य सुविधा असोत, केवळ शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान अर्थात एआय, डिजिटल साधने असोत, हे सर्व ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना साथ द्या, तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, विकासकामांसाठी कधीच निधी कमी पडू देणार नाही, हा माझा शब्द आहे,’ असे म्हणत पवार यांनी मतदारांना साद घातली आहे.
दोन दिवसांवर निवडणूक आली असताना या व्हिडिओ संदेशामुळे मतदारांवर काय परिणाम होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.









