अमरावती महापालिकेचा १७वा महापौर आणि उपमहापौर आज, शुक्रवारी निश्चित होणार आहे. संख्याबळ लक्षात घेता महायुतीतील भाजप, युवा स्वाभिमानी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. काँग्रेस आणि बसपचे उमेदवार शेवटच्या क्षणी अर्ज कायम ठेवतात की माघार घेऊन अविरोधी निवड घडवून आणतात याकडे लक्ष लागून आहे.
महापौरपदासाठी भाजपकडून श्रीचंद तेजवानी मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे डॉ. संजय शिरभाते आणि बसपचे इस्माईल कासम लालुवाले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उपमहापौरपदासाठी महायुतीतर्फे युवा स्वाभिमानी पक्षाचे सचिन भेंडे उमेदवार असून, काँग्रेसच्या लुबना तनविर सैयद मखदूम आणि बसपचे सचिन वैद्य यांच्याशी त्यांची लढत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून, प्रत्यक्ष मतदानापूर्वी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी दिला जाणार आहे. त्या वेळेत विरोधी पक्षांनी माघार घेतली तर महापौर-उपमहापौरांची निवड अविरोध होईल; अन्यथा आवाजी मतदानाद्वारे निर्णय होणार आहे.
८७ सदस्यीय महापालिकेत बहुमतासाठी ४४ नगरसेवकांची आवश्यकता आहे. महायुतीकडे भाजपचे २५, युवा स्वाभिमानी पक्षाचे १५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ असे एकूण ५१ नगरसेवक असल्याने संख्याबळाच्या जोरावर ही निवडणूक केवळ औपचारिकता ठरणार आहे.









