गोंधळ घालत शिक्षक दाम्पत्यास मारहाण

महाराष्ट्र टाइम्स

मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक आणि त्यांच्या पत्नीला ग्रामस्थांनी मारहाण केली. प्रजासत्ताक दिनी मुलींना लेझीममध्ये घेतल्याने हा वाद झाला. शाळेतच शिक्षक दाम्पत्याला मारहाण करून धमक्या देण्यात आल्या. पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे घाबरलेल्या शिक्षक दाम्पत्याने रजा घेतली आहे.

assault on teacher couple attack by villagers

उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक व त्यांच्या शिक्षक पत्नीस ‘आमच्या मुलींना सांस्कृतिक कार्यक्रमात लेझीममध्ये का घेतले’ यावरून ग्रामस्थांनी मारहाण केली. मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेत ही घटना घडली.

देऊळगाव साकर्शा येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेत प्रजासत्ताकदिनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. यामध्ये मुलींनी लेझीममध्ये भाग घेतला. याच कारणावरून मुख्याध्यापक शेख अमिन शेख जुम्मा तसेच सहकारी शिक्षिका तथा त्यांच्या पत्नीवर हल्ला झाला. ३१ जानेवारी रोजी सायंकाळी शाळेत असताना काही लोकांनी शाळेतच शिक्षक दाम्पत्याला मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. काही नागरिकांनी वाद मिटविला. दुसऱ्या दिवशी पुन्हा १ फेब्रुवारीला काही जणांनी शाळेत जावून मारहाण केली. तसेच अर्वाच्च शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. घटनेमुळे भयभीत झालेल्या मुख्याध्यापकांनी १ फेब्रुवारीला रात्री जानेफळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी चार जणांविरुद्ध बीएनएस कलम २९६, ११५ (२), ३५१ (२), २२१ नुसार गुन्ह्यांची नोंद केली.

या घटनेनंतर घाबरलेल्या शिक्षक दाम्पत्याने मेहकर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करून आपत्कालीन रजा घेतली.