मंडळ अधिकारी, तलाठ्यांना कारणे दाखवा नोटीस बाजावल्याने तलाठी संघटनाही आक्रमक झाली. त्यांनी थेट उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. अवैध वाळू वाहतूकीवर कारवाई करताना वाळू तस्करांकडून थेट हल्ले केले जातात. असे प्रकार तालुक्यात घडलेले आहे. यासाठी पोलिस बंदोबस्त व आधिकचे मनुष्यबळ गरजेचे आहे. या संदर्भात वरिष्ठांनी ठोस निर्णय घेऊन पथकाला सुरक्षा देणे गरजेचे असल्याचे तलाठी संघटनेने म्हटले आहे. अवैध वाळू वाहतुकीवरुन महसूल विभागामधील वाद चव्हाट्यावर आला आहे.
सिल्लोड तालुक्यात विविध ठिकाणी छापा मारुन जप्त करण्यात आलेल्या वाळूसाठा प्रकरणी १३ शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर २ कोटी ४९ लाख ९३ हजारांचा बोजा चढवण्यात आला आहे. तहसीलदारांच्या या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले असून अवैध वाळू वाहतूक प्रकरणी तहसीलदारांनी मंडळ अधिकारी व तीन तलाठ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस देखील बजावलेली आहे.
तालुक्यातील पिंपळगाव पेठ, केऱ्हाळा, खोडकाईवाडी, धानोरा, उपळी, बोरगाव बाजार, सिसारखेडा आदी ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरु होती. तर अनेक ठिकाणी वाळूचा मोठ्या प्रमाणात साठा केलेला आहे. रविवारी (एक फ़ेब्रुवारी) तहसीलदार संजय देवराये यांनी अचानक गौण खनिज पथकाला घेऊन तालुक्यातील पिंपळगाव पेठ, केऱ्हाळा, खोडकाईवाडी, बोरगाववाडी शिवारात पाहणी करून जवळपास ७०० ब्रास वाळूसाठा जप्त केला. तर सोमवारी (दोन फेब्रुवारी) वाळूसाठा सापडलेल्या शेतमालकांवर दंडात्मक कार्यवाही प्रस्तावित करुन सातबाऱ्यावर बोजा चढवण्याचे आदेश संबंधित तलाठ्यांना दिले.
जप्त वाळूसाठा प्रकरणी सलीम पठाण (रा. केऱ्हाळा) यांच्या गट नं. ४३८ मधील सातबाऱ्यावर १ लाख ३१ हजार, इम्रान शेख युसूफ (रा. केऱ्हाळा) गट नं. ११५ वर २७ लाख ६३ हजार, ज्ञानेश्वर पांडुरंग दारुंटे (रा. केऱ्हाळा) गट नं. ५४९ वर १ लाख ९२ हजार ६०० रुपये, संजय पंडित कळम ( (रा. केऱ्हाळा) गट नं. ५५८ वर ७० हजार २०० रुपये, नजीर शेख बुऱ्हाण (रा. बोरगाववाडी) गट नं. ३९० वर १५ लाख ३९ हजार, बाबुराव कोडींबा दुधे, ईश्वर भिका दुधे, भास्कर प्रभाकर दुधे (रा. खोडकाईवाडी) गट नं. १९० वर २७ लाख ६३ हजार, मोतीराम तेजराव पंडित (रा. खोडकाईवाडी) गट नं. २०८ वर ३ लाख १५ हजार, रेखा फकिरचंद हाडोळे (रा. खोडकाईवाडी) गट नं. २०८ वर १ लाख ६२ हजार, कडूबा त्रिबक हाडोळे (रा. खोडकाईवाडी) गट नं. २०८ वर ४ ६८ हजार, लिंबाजी सांडू दिवटे (रा. पिंपळगाव पेठ, गणेशवाडी) गट. नं. ४५ लाख ९९ हजार, शांताराम पुंजाजी बेलेवार ((रा. पिंपळगाव पेठ, गणेशवाडी) गट नं. १६९ वर १२ लाख ३३ हजार, साहेबराव गबाजी दिवटे, तालुकराव गबाजी दिवटे (रा. पिंपळगाव पेठ, गणेशवाडी) गट नं. ११३ वर ९१ लाख ८९ हजार, साहेबराव दिवटे (रा. पिंपळगाव पेठ, गणेशवाडी) गट नं. ११४ वर १५ लाख ३९ हजारांचा बोजा चढवण्यात आला आहे.
सूचना देऊनही वाहतूक सुरुच
दरम्यान अवैध वाळू रोखण्यासाठी पथक नियुक्त करण्यात आलेले आहे. कारवाई करण्याच्या सूचना देऊनही पिंपळगाव पेठ, केऱ्हाळा, खोडकाईवाडी येथून वाळू वाहतूक सुरुच होती. यामुळे तहसीलदारांनी मंडळ अधिकारी काशिनाथ ताठे (सिल्लोड), तलाठी किरण तायडे (सिल्लोड), दीपक बागुल (पिंप्री), मुक्तार शाह (केऱ्हाळा) यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तर यानंतर तहसीलदारांनी अचानक ॲक्शन मोडवर येत वाळूसाठे जप्त करीत सातबाऱ्यांवर बोजा चढवण्याचे आदेश काढले.






