आईच्या शोधात हिमस्टेडचा महापौर नागपुरात

Contributed byम.टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नेदरलँड्समधील हिमस्टेड शहराचे महापौर फाल्गुन बिनेनडिक यांनी नागपुरात आपल्या जन्मदात्री आईचा शोध घेतला. लहानपणी अनाथ आश्रमात वाढलेल्या फाल्गुन यांनी ज्या अधीक्षिकेने त्यांना वाढवले, त्यांची भेट घेतली. या भेटीने त्यांचे मन भरून आले. फाल्गुन यांनी आपल्या आईला संदेश दिला की त्यांचा मुलगा सुरक्षित आहे. या भेटीने आयुष्याचे एक वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

आईच्या शोधात हिमस्टेडचा महापौर नागपुरात

फाल्गुन हे आजही जन्मदात्री आईचा शोध घेत आहेत. तान्हे असताना टाकून गेल्याचा राग कोणत्याही जिवाला येणारच. पण फाल्गुन म्हणतात, माझ्या मनात कसलाही राग नाही आणि कुणाविषयी तक्रार नाही. तुझा मुलगा सुरक्षित आहे, एवढेच मला सांगायचे आहे, असे ते सांगतात. या भेटीने आयुष्याचे एक वर्तुळ पूर्ण होईल, अशी भावना व्यक्त करतात. त्यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालायात अनाथगृह होते, इथेच फाल्गुन यांचे पालनपोषण झाले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या निर्देशानुसार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडून फाल्गुन यांच्या आप्तांचा शोध घेतला जाणार आहे, असे जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुश्ताक पुठाण यांनी सांगितले.

आपल्या मुळांना शोधत नेदरलॅण्ड्सच्या हिमस्टेड शहरातील भारतीय वंशाचा मुलगा नुकताच नागपुरातील ज्या अधीक्षिकेने त्याला नवजात असताना वाढविले, तिला येऊन भेटला. या भेटीने आपुलकीच्या माणसांप्रती असलेली त्याची जिव्हाळ्याची नाळ अजूनही किती पक्की आहे, हे सिद्ध झाले. हा मुलगा हिमस्टेडचा महापौर आहे. या ४१ वर्षीय मुलाचे नाव आहे, फाल्गुन बिनेनडिक .

उपराजधानीत १० फेब्रुवारी १९८५ रोजी जन्मलेल्या या नवजात बाळाच्या नशिबी अवघ्या तीन दिवसांतच पोरकेपण आले. रक्ताच्या नात्यांनी पाठ फिरविली आणि हा चिमुकला जीव शहरातील एका अनाथाश्रमात दाखल झाला. आयुष्याची सुरुवातच अनिश्चिततेने झाली होती. सुमारे एक महिना त्या अनाथाश्रमात राहिल्यानंतर नेदरलॅण्ड्समधील एका डच दाम्पत्याने या बाळाला दत्तक घेतले. सातासमुद्रापार नेले. तिथे फाल्गुनला केवळ घरच नाही तर प्रेम, सुरक्षितता आणि स्वतःची ओळखही मिळाली. आज, हा फाल्गुन नेदरलॅण्ड्समधील हिमस्टेड या शहराचा महापौर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.

परदेशात यश, प्रतिष्ठा आणि ओळख मिळवूनही त्यांच्या मनात जन्मभूमीची ओढ कायम होती. याच ओढीपोटी फाल्गुन पुन्हा भारतात, आपल्या जीवनकहाणीच्या सुरुवातीच्या ठिकाणी नागपुरात आले. ज्या अधीक्षिकेने त्यांना तान्हुले असताना सांभाळले, त्यांना ते खास येऊन भेटले. मंगला भुसारी असे या अधीक्षिकेचे नाव आहे. या वेळी दोघांनाही झालेला आनंद शब्दात वर्णन करता न येणाराच होता. फाल्गुन महिन्यात जन्म झाला म्हणून मुलाचे नाव अधीक्षिकेने ‘फाल्गुन’ ठेवले होते.