भंडारा जिल्ह्यातील तावशी गावात लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाला. युवतीच्या नातेवाईकांनी तरुणाच्या घरी जाऊन त्याला आणि त्याच्या भावाला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. दिघोरी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.
लग्नाला नकार दिल्याने संतापलेल्या तरुणाने आपल्या भावासह मित्रांवर जीवघेणा हल्ला केला. भंडारा जिल्ह्यातील दिघोरी पोलिस ठाणे हद्दीतील तावशी गावात ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तावशी गावात राहणाऱ्या विक्की रायभान बडोले या तरुणाचे लग्न एका मुलीसोबत ठरले होते. मात्र, त्या मुलीचे दुसऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती विक्कीला मिळाली. त्यामुळे त्याने हे लग्न करण्यास नकार दिला. या गोष्टीने संतापलेल्या मुलीचा भावजी धम्मरत्न सुधीर टेंभुर्णे याने आपल्या साथीदारांसह विक्कीच्या घरासमोर धडक दिली.आरोपींनी विक्कीच्या घरासमोर येऊन त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर आरोपींनी विक्की आणि त्याच्या भावावर लाठ्याकाठ्यांनी आणि हातांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात विक्कीच्या उजव्या पायाचा पंजा, कोपर आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे. दिघोरी पोलिसांनी या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.