आम्ही जाणार, नकार त्यांचा

Contributed byम. टा. विशेष क्रीडा प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारत-पाकिस्तान सामन्याबाबत अनिश्चितता आहे. पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने सांगितले की, भारताविरुद्ध खेळायचा की नाही हा निर्णय पाकिस्तान सरकार घेईल. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने स्पष्ट केले की, भारतीय संघ कोलंबोला जाणार आहे आणि खेळण्यास तयार आहे. पाकिस्तानने खेळण्यास नकार दिल्यास त्याचे नियम पाळले जातील. वॉशिंग्टन सुंदरच्या दुखापतीवरही चर्चा झाली.

आम्ही जाणार, नकार त्यांचा

कोलंबो : ‘भारताविरुद्धच्या सामन्याबाबतचा निर्णय हा आमच्या सरकारचा निर्णय आहे. त्यावर आमचे काही नियंत्रण नाही,’ याचा पुनरुच्चार पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा याने केला. वर्ल्ड कपच्या निमित्ताने झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने हे मत व्यक्त केले. ‘भारताविरुद्धच्या सामन्याबाबतचा निर्णय सरकारचा आहे. आम्ही त्याचा आदर करतो. आम्ही त्याचे पालन करणार आहोत. आता तो सामना होणार की नाही याबाबत मला काहीही माहिती नाही. आम्ही सरकारच्या निर्णयानुसार ठरवणार आहोत. आमची त्यानंतर उपांत्य किंवा अंतिम फेरीत भारताविरुद्ध लढत असेल, तर आम्ही सरकारकडे विचारणा करणार आणि ते जे सांगणार तेच करणार,’ असे सलमानने स्पष्ट केले. ‘बांगलादेश या स्पर्धेत खेळत नाहीत हे दुर्दैव आहे. ते आमच्या भावासारखे आहेत. ते आम्हाला साथ देऊ शकतात,’ असेही तो म्हणाला. भारताविरुद्धच्या प्रश्नानंतर सलमानला अमेरिकेविरुद्धच्या गतस्पर्धेतील पराभवाबाबत विचारणा करण्यात आली. त्याने तो इतिहास झाला असल्याचे सांगितले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या यशाबाबत विचारणा केल्यावर तो सुखावला.

‘आम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिलेला नाही. त्यांनी खेळणार नाही, असे म्हटले आहे,’ अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने व्यक्त केली. टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा काही दिवसांवर असताना भारत-पाक सामन्याबाबत अनिश्चितता आहे. त्याबाबत सूर्याने भारतीय क्रिकेट संघाची भूमिका स्पष्ट केली.

वर्ल्ड कप स्पर्धेस शनिवारी सुरुवात होत आहे. स्पर्धेपूर्वीची कर्णधारांची पत्रकार परिषद आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( आयसीसी ) एकाच वेळी मुंबई आणि कोलंबो येथे घेतली होती. त्यात अर्थातच सूर्याला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत विचारणा करण्यात आली. सूर्या या प्रश्नास तयारच होता. त्याने भारतीय संघाचा कार्यक्रम ठरलेला आहे. त्यानुसारच सर्व काही होईल, असे सांगितले. त्याने जणू याबाबत जे काही ठरवायचे आहे, ते पाकिस्तानने हेच सांगितले.

‘आमची मनोभूमिका स्पष्ट आहे,’ सूर्याने खास त्याच्या शैलीत ठामपणे सुरुवात केली. ‘आम्ही त्यांच्याविरुद्ध खेळण्यास नकार दिलेला नाही. त्यांनी खेळणार नाही, असे म्हटले आहे. आमची विमानाची तिकिटे आरक्षित झालेली आहेत. त्यानुसार आम्ही कोलंबोला जाणार आहोत. आमचा कार्यक्रम तयार आहे. शनिवारी आम्ही अमेरिकेविरुद्ध खेळणार आहोत. त्यानंतर आमची कॅनडाविरुद्ध लढत आहे. त्यानंतर आम्ही कोलंबोला प्रयाण करणार. आम्ही तर जाणार आहोत. त्यानंतरचे तिकडे गेल्यावरच बघू,’ असे सूर्याने स्पष्ट केले. वर्ल्ड कप किंवा कोणत्याही स्पर्धेत एखाद्या संघाने सामना खेळणार नाही, असे सांगितले तरी प्रतिस्पर्धी संघास मैदानावर येणे बंधनकारक असते; तसेच त्या संघास सामन्यापूर्वीची आणि सामन्यानंतरची पत्रकार परिषदही बंधनकारक असते.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी पाकिस्तानचा संघ भारताविरुद्धचा सामना खेळणार नाही, याचा पुनरुच्चार केला आहे. भारत-पाक सामना रद्द झाल्याचा खेळावर परिणाम होणार नाही का, अशी विचारणा केल्यावर सूर्याने पुन्हा फटकेबाजी सुरू केली. ‘त्यांचा निर्णय माझ्या हातात नाही. याबाबतचा निर्णय घेणे मला आवडले असते; पण निर्णय त्यांचा आहे,’ असे सूर्याने स्पष्ट केले. ‘स्पर्धा वेळेपत्रकानुसार आमचा त्यांच्याविरुद्धचा सामना १५ तारखेस आहे. आम्ही आशिया कपमध्ये त्रयस्थ ठिकाणी त्यांच्याविरुद्ध तीन सामने खेळलो. आता कोलंबोतही संधी मिळाली, तर त्यांच्याविरुद्ध खेळण्यास तयार आहोत,’ असे त्याने स्पष्ट केले.

वॉशिंग्टन संघात; पण

मुंबई : ‘ अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर अजूनही भारतीय संघाचाच भाग आहे. त्याची आम्ही प्रतीक्षा करण्यास तयार आहोत,’ असे भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितले. मात्र, निवड समिती पर्यायांबाबत विचार करीत आहे. निवड समितीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मधून नेमकी परिस्थिती जाणून घेतला असे समजते. न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे मालिकेतील पहिल्या सामन्याच्यावेळी तो जायंबंदी झाला होता. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.