हलगर्जीपणा करणाऱ्यावर कारवाई

महाराष्ट्र टाइम्स

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या कामाचा आढावा घेतला. त्यांनी निवडणूक कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला. निवडणूक प्रक्रिया शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आणि सीसीटीव्हीद्वारे देखरेख ठेवण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

हलगर्जीपणा करणाऱ्यावर कारवाई
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

‘लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकीत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, ’ असा इशारा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला.

खुलताबाद येथील कैलास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे भेट देऊन ‘स्ट्राँग रूम’ व निवडणूक साहित्य कक्ष, संगणक कक्षाची पाहणी करून त्यांनी निवडणूक कामाचा आढावा घेतला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुचिता शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष गुट्टे, प्रकाश नाईक यांनी निवडणूक निर्णय प्रक्रियेतील कामकाजाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला.

‘जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक पारदर्शक, निर्भय आणि शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने सज्ज राहावे,’ अशा सूचनाही स्वामी यांनी या वेळी दिल्या. खुलताबाद तालुक्यातील १०४ मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतीत सूचना देऊन तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, रॅम्स, पिण्याचे पाणी, वीज पुरवठा, स्वच्छतागृह यांची उपलब्धता प्रत्यक्षात तपासून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर लक्ष ठेवून तालुक्यातील संवेदनशील अतिसंवेदनशील मतदान केंद्राची माहिती घेऊन तेथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही द्वारे देखरेख ठेवण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. भरारी पथके व आचारसंहिता कक्षाने आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी सतर्क राहून काम करावे, अशा सूचना दिल्या.