संघामुळे भाजपला ‘अच्छे दिन’

महाराष्ट्र टाइम्स

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण विधान केले. त्यांनी स्पष्ट केले की भाजपला चांगले दिवस संघाच्या कार्यामुळे आले आहेत. संघाने मांडलेले मुद्दे लोकांना आवडतात आणि तेच मुद्दे स्वीकारल्याने भाजपला यश मिळाले. राम मंदिर प्रश्नावर भाजपने काम केल्याने त्यांना केंद्रात सत्ता मिळाली. संघाचे कार्य लोकांच्या विश्वासावर आणि स्वयंसेवकांच्या परिश्रमावर आधारित आहे.

संघामुळे भाजपला ‘अच्छे दिन’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अद्याप भारतरत्न का नाही?’, या प्रश्नावर ‘मी त्या समितीवर नाही. समितीचे कोणी भेटले तर मी त्यांना विचारेन. पण सावरकरांना भारतरत्न मिळाला तर त्या पुरस्काराचाच सन्मान वाढेल. ते सन्मानाविनाही लाखो, कोट्यवधी लोकांचे हृदयसम्राट आहेत’, असे उत्तर सरसंघचालकांनी देताच सभागृहात टाळ्यांचा कडकटाट झाला.

‘भाजपमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अच्छे दिन आले, असे नाही. उलट आहे, संघामुळे भाजपला अच्छे दिन आले. आम्ही लोकांसमोर जे मुद्दे मांडतो ते लोकांना आवडतात आणि तेच मुद्दे जो पक्ष घेतो, त्याला फायदा होतो. आम्ही राम मंदिरचा प्रश्न मांडला आणि भाजपने तो उचलून धरला म्हणून भाजपला केंद्रात यश मिळाले’, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी मुंबईत केले.

संघाच्या शताब्दीनिमित्त वरळी येथील नेहरू केंद्राच्या सभागृहात आयोजित ‘संघ यात्रा के १०० वर्ष- नए क्षितिज’ या विषयावरील सरसंघचालकांचे व्याख्यान शनिवारी झाल्यानंतर रविवारी प्रश्नोत्तराच्या सत्रांनी या कार्यक्रमाचा समारोप झाला. यावेळी विविध क्षेत्रांतील नऊशेहून अधिक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी मांडलेल्या एकूण १४३ प्रश्नांचे १४ श्रेणींमध्ये वर्गीकरण करून संघाचे सुहास पोतदार यांनी ते भागवत यांच्यासमोर मांडले. संघनीती, हिंदुत्व , राष्ट्रीयत्व, परराष्ट्र धोरण, शिक्षण, क्रीडा, राजकारण, अर्थकारण, पर्यावरण, लोकसंख्या अशा सर्व प्रश्नांवर भागवत यांनी स्पष्ट उत्तरे देऊन संघाची भूमिका मांडली.

‘संघ कोणासाठी नव्हे तर नीतीसाठी काम करतो. ती नीती लोकांनी स्वीकारली. निवडणुकीच्या राजकारणात कोणी ती स्वीकारावी, असे आम्ही सांगितले नव्हते. आमचे काम वाढल्यानंतर राममंदिरची नीती ज्यांनी स्वीकारली त्यांना लाभ झाला. आमचे काम गुरुजी जन्मशताब्दीने सुरू झाले. मग वेगवेगळ्या कठीण काळात, आणीबाणीच्या काळात, रामजन्मभूमी आंदोलन, अशा विविध वेळी केलेल्या कामाने आमचे बळ वाढले. लोकांचे प्रेम व विश्वास मिळाला आणि स्वयंसेवकांनी अखंड परिश्रम केले. त्यामुळेच आमचे अच्छे दिन आले’, अशी कारणमीमांसा भागवत यांनी याविषयीच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.

अनुसूचित जातीची व्यक्तीही सरसंघचालक होऊ शकते...६