सद्गुरुदास महाराज यांचे निधन

महाराष्ट्र टाइम्स

शिवकथाकार विजयराव देशमुख यांचे बुधवारी हृदयविकाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. 'शककर्ते शिवराय' या ग्रंथातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची १९ फेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख निश्चित केली. त्यांनी देशभरात हजारो शिवचरित्र व्याख्याने दिली. त्यांच्या कार्यामुळे शिवजयंतीचा वाद संपुष्टात आला.

सद्गुरुदास महाराज यांचे निधन
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

शिवकथाकार विजयराव देशमुख यांनी सखोल संशोधनातून लिहिलेल्या ‘शककर्ते शिवराय’ या शिवचरित्राला वाचकांची आणि संशोधकांची पसंती लाभली होती. त्यांच्याच संशोधनाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांची १९ फेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख निश्चित केली आणि शासनाने ती स्वीकारली. यासाठी देशमुख यांनी अथक परिश्रम घेतले. कित्येक असंख्य साधनांचा, कागदपत्रांचा चिकित्सक अभ्यास केला. अस्सल पुरावे तपासले. त्यांच्या या संशोधनामुळे शिवजयंतीचा वाद संपुष्टात आला.

गुरू मंदिर परिवाराचे आधारस्थान ‘धर्मभास्कर’ सद्गुरुदास महाराज अर्थात प्रसिद्ध शिवकथाकार विजयराव देशमुख यांचे बुधवारी हृदयविकाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. ‘शककर्ते शिवराय’ या शिवचरित्रग्रंथाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य जनमानसापर्यंत पोहोचविण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले. गुरू मंदिर परिवाराच्या माध्यमातून त्यांनी आध्यात्मिक कार्यात स्वत:ला झोकून दिले.

सद्गुरूदास महाराजांवर मागील काही दिवसांपासून स्थानिक विवेका हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. बुधवारी सायंकाळी त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव जयप्रकाशनगर येथील त्यांच्या निवासस्थानी अनुयायांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येईल. दुपारी तीन वाजता सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात मुलगा अजय; तसेच नीता काटेकर, प्रज्ञा फडणीस, वर्षा वेलंकीवार या तीन मुली व नातवंडे आणि मोठा भक्तपरिवार आहे.

सद्गुरूदास महाराज यांचा जन्म २८ जानेवारी १९४२ रोजी अकोला जिल्ह्यातील गाडेगाव येथे शेतकरी कुटुंबात झाला. वयाच्या १९व्या वर्षापासून त्यांनी शिवकार्याला प्रारंभ केला. आपल्या ओजस्वी, रसाळ शैलीत त्यांनी देशभरात दहा हजारांहून अधिक शिवचरित्र व्याख्याने दिली आहेत. सुमारे सहा लाख शिवभक्तांनी त्यांची व्याख्याने प्रत्यक्ष ऐकली आहेत. सन १९७४ ते १९९२ अशी सतत १८ वर्षे त्यांनी ‘शिवदुर्ग दर्शन यात्रे’चे आयोजन केले. हजारो शिवभक्तांना दुर्गभ्रमंती घडविली. छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे ते संस्थापक होते.

ऐंशीच्या दशकात राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जन्मतिथीचा बोध त्यांना एका पोवाड्यातून झाला. १२ जानेवारी १५९८ ही जिजाऊंची जन्मतारीख असल्याचे त्यांनी संशोधनाअंती सांगितले.