शिवसेना हा विकासाचा पक्ष असून, नागरिकांच्या कामासाठी सर्वांनी एकजूट होऊन कार्य करावे. यापुढे गटा-तटाचे राजकारण कोणत्याही परिस्थितीत चालणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गटबाजी करणाऱ्यांना दिला. तसेच कल्याण-डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या धर्तीवर उपमहापौरपद सव्वा वर्ष, तर गटनेतेपद एक वर्षासाठी दिले जाणार आहे, अशी माहिती पक्षाचे संपर्क नेते राम रेपाळे यांनी दिली. परंतु, यासंदर्भातील अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री शिंदे हेच घेतील असे सांगत, रेपाळे यांनी पदवाटपाबाबतचा ‘सस्पेन्स’ कायम ठेवला आहे.
भाजपने नाशिकमध्ये शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतल्यानंतर शिवसेनेत उपमहापौरपदासाठी विलास शिंदे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, राहुल दिवे, सुवर्णा मटाले आदी इच्छुक होते. परंतु, पक्षाकडून शिंदे यांना उपमहापौरपद देण्यात येऊन इतरांना माघारी घेण्याचे फर्मान सोडले. त्यावर तिदमेंसह एका गटाने आक्षेप घेतला. गेल्या पंचवार्षिकमध्ये शिंदे यांच्याकडे गटनेतेपद आणि अजय बोरस्ते यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद दिल्याने यंदा इतरांना संधी देण्याची मागणी तिदमेंसह नगरसेवकांनी केली. तिदमे यांनी महानगरप्रमुख व नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. यामुळे पक्षातील गटबाजी पुन्हा उफाळून आली होती. या संदर्भात सोमवारी (ता. १०) रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मलबार हिल येथील निवासस्थानी बैठक झाली. या वादावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांचीही कानउघाडणी केली. बैठकीत नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला .
नाशिकच्या विकासासाठी एकत्रित काम करा, आपसातील गटबाजीला पूर्णविराम देण्याचा संदेश शिंदेंकडून देण्यात आला. पक्षशिस्त, समन्वय, संघटनात्मक बळकटीवर भर देत संघटनावाढीसाठी काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. उपमहापौर , गटनेतेपद सव्वा वर्षासाठी ठेवण्याचे पक्षाचे धोरण असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अंतरर्गत नाराजीनाट्य तूर्त लांबणीवर पडल्याचेे मानले जात आहे.








