चार भाविकांचा अपघाती मृत्यू

महाराष्ट्र टाइम्स

परभणी जिल्ह्यातील जिंतूरजवळ भाविकांच्या वाहनाला अपघात झाला. देवदर्शनासाठी उज्जैनला निघालेले चार भाविक या अपघातात मृत्युमुखी पडले. एक जण गंभीर जखमी झाला असून त्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

चार भाविकांचा अपघाती मृत्यू
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या गंगाखेड येथील भाविकांच्या वाहनाचा जिंतूर तालुक्यातील अकोली पुलाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी, १२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री हा अपघात घडला. वाहनचालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेने गंगाखेड आणि जिंतूर परिसरात शोककळा पसरली आहे.

गंगाखेड येथील पाच भाविक उज्जैन येथील धार्मिक स्थळी दर्शनासाठी निघाले होते. ते जिंतूरमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना, जिंतूर शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोली पुलाजवळ त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात, १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. घुगे आणि चालक पवार यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जिंतूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख मुद्दसीर आणि रुग्णकक्ष सेवक गंगाधर पालवे यांनी तपासणी केली. तपासणीनंतर बालाजी आश्रोबा औटी (वय २८), बालाप्रसाद घोरपडे (वय २९), कृष्णा गुट्टे (वय २६) आणि रोहन संजय राठोड (वय २५) या चौघांना मृत घोषित करण्यात आले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या गोपाळ रोकडे (वय २८) याला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, दत्तात्रेय गुंगाणे, मेजर थोरवे आणि पैठणे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने पंचनामा केला. बिट जमादार दत्तात्रय गुंगाणे यांच्या फिर्यादीवरून वाहनचालक अभिजीत दत्तात्रय शिंगाडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विजय जाधव करत आहेत.

जिंतूर ग्रामीण रुग्णालयात डॉ. प्रमोद पारवे, डॉ. मोहिनी हरकळ आणि रुग्णकक्ष सेवक गंगाधर पालवे यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.