महापौर, उपमहापौर निवडीनंतर आता स्थायी समिती सदस्य व स्वीकृत सदस्य निवडीचे वेध नगरसेवकांना लागले आहे. महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या सूचनेनुसार स्थायी समितीचे १६ सदस्य निवडीसाठी येत्या सोमवारी (ता. १६) विशेष महासभा बोलावण्यात आली आहे. शिवसेनेला मनसेने साथ दिल्यामुळे स्थायी समितीत भाजपचा एक सदस्य घटला आहे. तर शिवसेना ‘उबाठा’ आणि काँग्रेसची गटनोंदणी झाल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला स्वीकृत सदस्यावर पाणी सोडावे लागणार आहे.
महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर आता सभागृहनेता, स्थायी समिती सभापती, विषय समित्यांसह विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाणार आहे. विभागीय आयुक्तांकडून नगरसचिव विभागाला अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार आता गुणांकन निश् चित करून स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती केली जाईल. त्यासाठी सोमवारी विशेष महासभा होणार असल्याचे महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी सांगितले. १२२ सदस्यांच्या सभागृहात स्थायी समितीच्या सोळा सदस्य नियुक्तीसाठी ७.६२५चा कोटा आवश्यक आहे. भाजपला मिळालेल्या सदस्य संख्येनुसार १०, २६ नगरसेवक असलेल्या शिवसेनेला ३ सदस्य, तर १५ सदस्य संख्या असल्याने ‘उबाठा’ला २ तर ४ सदस्य संख्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला उतरत्या क्रमानुसार एक जागा होती. परंतु शिवसेना व मनसेची आघाडी झाल्याने शिवसेनेच्या कोट्यात वाढ होऊन एक सदस्य अधिक जाईल. परिणामी भाजपचे गुणांकन घटणार असल्याने नऊ सदस्य स्थायीवर जातील, असा अंदाज आहे.
शिवसेना-मनसे आघाडी
महापालिकेत २६ सदस्य संख्या असलेल्या शिवसेनेसोबत मनसेने गटनोंदणी करून शहर विकास आघाडी केली. त्यामुळे गट म्हणून २७ सदस्य संख्या झाली आहे. त्यामुळे स्थायीत शिवसेनेचे चार सदस्य निवडले जातील. शिवसेना ‘उबाठा’ ने काँग्रेसच्या तीन सदस्यांना सोबत घेत शहर विकास आघाडी म्हणून नोंदणी केली. त्यामुळे ‘उबाठा’चे १५ व काँग्रेसचे तीन असे एकूण १८ सदस्य आहेत. त्यांना स्वीकृत सदस्यात अतिरिक्त एक जागा मिळेल.
शिवसेना ‘उबाठा’ आणि काँग्रेसच्या एकत्रित गटनोंदणीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आता स्वीकृत सदस्यपदापासून वंचित रहावे लागणार आहे. महापालिकेच्या सभागृहात दहा स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. एकूण सदस्य संख्या १२२ याप्रमाणे भाजपचा गुणांक ५.९० होतो. पाच सदस्य निश् चित झाल्यानंतर उर्वरित .९० ही संख्या पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने पूर्णांकात एक ग्राह्य धरली जाते. त्यामुळे भाजपचे सहा सदस्य स्वीकृत होतील. शिवसेना व मनसेचा गुणांक २.२१ होत असल्याने दोन स्वीकृत जातील, तर आता ‘उबाठा’ व काँग्रेसने नोंदणी केल्याने १८ सदस्य होतात. त्यामुळे गुणांक १.४७ होतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा गुणांक ०.३२ आहे. आघाडीचा गुणांक राष्ट्रवादीपेक्षा अधिक म्हणजे .४७ असल्याने आघाडीचे दोन स्वीकृत सदस्य होतील. आघाडीची नोंद झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वीकृत सदस्यपद अडचणीत आले आहे.



