पुणे आणि परिसरात ड्रोन आणि अन्नप्रक्रिया असे दोन क्लस्टर उभारण्यात येणार आहेत. त्याकरिता केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाने (एमएसएमई) तत्त्वत: मंजुरी दिली आहे. राज्य सरकारने प्रस्ताव पाठविल्यानंतर पुढील आर्थिक वर्षात दोन्ही क्लस्टरना मान्यता मिळेल. भोसरी आणि हडपसर येथे हे क्लस्टर प्रस्तावित आहेत.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ ॅग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए) माध्यमातून हे क्लस्टर उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी केंद्राकडून प्रत्येकी सुमारे ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून, मार्च २०२७ अखेरपर्यंत दोन्ही क्लस्टर कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. या दोन्ही क्लस्टरमुळे सुमारे ७० ते १०० उद्योगांना थेट फायदा होणार आहे, तर पूरक उद्योगांसह रोजगारनिर्मितीधीही मोठ्या प्रमाणावर होईल.
याबाबत ‘एमसीसीआयए’चे महासंचालक प्रशांत गिरबने म्हणाले, ‘दोन्ही क्लस्टरसाठी विशेष वहन कंपनी (स्पेशल पर्पज व्हेईकल, एसपीव्ही) स्थापण्यात आली आहे. राज्य सरकारसोबत प्राथमिक चर्चा झाली आहे. मात्र, अधिकृत निर्णय एका बैठकीत घेतला जाईल. राज्याच्या उद्योग मंत्रालयाकडून हा प्रस्ताव केंद्रीय ‘एमएसएमई’ मंत्रालयाच्या उपसंचालक अनुजा बापट यांच्याकडे प्रस्ताव जाईल. केंद्रीय मंजुरीसाठी तीन महिने लागतील.’







