प्लास्टिक कारखान्याला भीषण आग

महाराष्ट्र टाइम्स

औद्योगिक वसाहतीत प्लास्टिक कारखान्याला भीषण आग लागली. आगीचे मोठे लोट आणि धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. कंपनीतील कामगार वेळेत बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. अग्निशमन दलाने फोमचा वापर करून आग आटोक्यात आणली. यात प्लास्टिक साहित्य, तयार माल आणि यंत्रसामग्री जळून खाक झाली. आगीचे कारण शॉर्टसर्किट, रासायनिक प्रतिक्रिया की हलगर्जीपणा याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

प्लास्टिक कारखान्याला भीषण आग
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

औद्योगिक वसाहत तिसऱ्या टप्प्यातील ओम साईकृपा कृषी साहित्य केंद्र प्लास्टिक ठिबक सिंचनाचे साहित्य उत्पादन करणाऱ्या कारखान्याला आग लागली. या भीषण आगीचे आणि धुराचे मोठे लोट उसळल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

धुराचा घाणेरडा वास औद्योगिक वसाहतीत सर्वत्र पसरला होता. उत्पादन विभागातून अचानक धूर निघताना दिसला आणि काही क्षणांतच या आगीने रौद्ररूप धारण केले प्लास्टिक व रसायनांच्या साहित्य असलेल्या साठ्याला आग लागली त्यामुळे आग झपाट्याने पसरली. कंपनीतील कामगार तत्काळ बाहेर पडल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी फोम या विशेष रसायनांचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवले. चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवला.

या आगीत कंपनीतील प्लास्टिक साहित्य, तयार माल आणि काही महत्त्वाची उपकरणे, यंत्रसामुग्री आणि प्लास्टिक रसायने जळून खाक झाली आहेत. आर्थिक नुकसान किती झाले, याचा अधिकृत अंदाज आलेला नाही. या ठिकाणी ठिबक सिंचनाच्या साहित्याचा खूप मोठा साठा गोदामात होता. शॉर्टसर्किट, रासायनिक प्रतिक्रिया की सुरक्षेतील हलगर्जीपणा याबाबत चौकशी करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रभारी अग्निशमन अधिकारी एस. बी. दराडे, संतोष काळे, नितेश ढाकणे, रविनाथ बनसोडे, जॉन गवळी, सादिक अली, विनायक चव्हाण, पंजाबराव देशमुख, संजय हिरे यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.