सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर व त्र्यंबकेश्वर परिसरातील निश्चित केलेल्या सर्व पार्किंग जागांची तातडीने भौतिक पाहणी करण्याचे निर्देश नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने महापालिका आणि बांधकाम विभागाला दिले आहेत. शहरातील मोठ्या भूखंडांचा या यादीत समावेश आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातील प्रारंभी प्रस्तावित १५ पार्किंग स्थळे; तसेच पोलिस विभागाने सुचविलेल्या अतिरिक्त जागांचाही यात समावेश करण्यात आला आहे. महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाला सात दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याची प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे. विभागीय आयुक्त तथा सिंहस्थ प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी महापालिकेला वाहनतळांसह पार्किंगसाठीचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. नाशिक महापालिका , सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे वाहतूक व्यवस्थापन व पार्किंग सुविधांसाठी नियोजन सुरू केले आहे. याअंतर्गत शहराच्या बाहेरून येणाऱ्या वाहनांना शहरात प्रवेश न देता नियोजित वाहनतळांवर वाहने पार्किंग करता येतील, यासाठी महापालिकेने हद्दीत २२ ठिकाणी वाहनतळे प्रस्तावित केली आहेत. यामध्ये पेठरोड, दिंडोरी रोड, धुळेरोड, पुणेरोड, गंगापूररोड, त्र्यंबकरोड, मुंबईरोड, संभाजीनगररोड आदी ठिकाणी वाहनतळांची उभारणी प्रस्तावित आहे. सर्व पार्किंग स्थळांची ९ फेब्रुवारीला संयुक्त पाहणी करून त्याचा अहवाल प्राधिकरणाकडे सादर करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले आहेत.
काही जागांबाबत स्पष्ट सीमांकन व डिजिटल नकाशे अद्याप प्रलंबित असल्याने अंतिम वाहतूक आणि पार्किंग आराखडा निश्चित करण्यापूर्वी प्रत्यक्ष पडताळणी आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सिंहस्थ काळात लाखो भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने वाहतूक व्यवस्थापनासाठी अचूक माहिती व पूर्वनियोजनाला प्राधान्य देण्यात येत आहे. सिंहस्थासाठी वाहतूक नियोजन शास्त्रीय पद्धतीने करण्यावर भर आहे. सर्व पार्किंग जागांची प्रत्यक्ष पडताळणी आणि डिजिटल नोंदणी वेळेत पूर्ण झाल्यास अंमलबजावणीच्या टप्प्यावर अडचणी टाळता येणार असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.



