खासगी कोचिंग क्लासमध्ये हिंदी भाषिक शिक्षकाच्या कानशिलात मारून ‘राडा’ करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चार कार्यकर्त्यांवर सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बुधवारी (दि. ११) सकाळी शरणपूररोड परिसरात हा प्रकार घडला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार अक्षय कोंबडे, ललित वाघ, रोहित उगावकर, बाजिराव मते अशी संशयितांची नावे आहेत. यश कुमार द्विवेदी (वय ४१, रा. सातपूर कॉलनी) यांनी फिर्याद दिली.
‘जेईई’च्या तयारीसाठी संबंधित क्लासमध्ये प्रवेश घेतलेला विद्यार्थी ३ फेब्रुवारीला क्लासऐवजी अभ्यासिकेत बसला होता. मदतनीस अभिनव कुमार यांनी त्यास त्याबाबत विचारणा केली. त्याच्या पालकांना फोनवर याबाबत माहिती दिली. संबंधित विद्यार्थी पालकांना घडल्या प्रकाराबाबत मराठीत माहिती देत होता. हिंदीत बोल म्हणजे पालकांना काय सांगतोय, ते मलाही कळेल असे अभिनव कुमार म्हणाला. त्यानंतर पाल्याला समजावून सांगतो असे सांगत पालक त्याला घेऊन गेले. बुधवारी सकाळी हा विद्यार्थी मनसेच्या कार्यकर्त्यांसह आला. हिंदीत बोलणाऱ्या शिक्षकांना काढून टाकून मराठी शिक्षकांना नोकरीवर घ्या, असे निवेदन देत मदतनीस अभिनव कुमार याला मारहाण केली.



