रुग्ण व दात्यांच्या स्नेहमिलनातून मूत्रपिंडांसह संपूर्ण आरोग्याची काळजी घेण्याविषयी तसेच मूत्रपिंड दान व मूत्रपिंड प्रत्यारोपणाविषयी जनजागृती केली जातेच; शिवाय जिथे-जिथे शक्य होईल तिथेही जनजागृतीही केली जाते. या अंतर्गत शाळा-महाविद्यालयांमध्येही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. शंका-कुशंकांचे निरसन केले जाते व विद्यार्थ्यांपर्यंत शास्त्रीय माहिती पोहोचवली जाते. याच जनजागृतीचा महत्त्वाचा भाग म्हणून स्नेहमिलनात रुग्ण व दात्यांना मनमोकळे करण्याची संधी दिली जाते, ज्यामुळे मूत्रपिंड दान व प्रत्यारोपणातील अनामिक भीती कमी होण्यास चांगलाच हातभार लागतो.
आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर मूत्रपिंड दान करून केवळ रुग्ण नव्हे तर त्याच्या कुटुंबाला सावरणाऱ्या दात्यांची काळजी घेणे ही नैतिक जबाबदारी समजून त्यांच्या आरोग्याचे पालकत्व पाच वर्षांपासून घेतले जात आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून दोन हजारपेक्षा जास्त मूत्रपिंड दात्यांच्या महत्त्वाच्या चाचण्या दरवर्षी करून त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. वर्षागणिक या दात्यांमध्ये ३०० ते ४०० जणांची भर पडत आहे.
शहरातील मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. गणेश बर्नेला यांनी हा उपक्रम २०२२ मध्ये सुरू केला आणि मूत्रपिंडदात्यांच्या स्नेहमिलनाची संकल्पना प्रत्यक्षात आणली. अर्थातच, मूत्रपिंड रुग्ण व मूत्रपिंड दात्यांच्या या स्नेहमिलनात सकाळपासून विविध उपक्रम आयोजित केले जातात. यानिमित्ताने सर्व दात्यांच्या सीबीसी, केएफटी, रक्तशर्करा, रक्तदाब आदी चाचण्या होतात. अहवालाच्या अनुषंगाने दात्यांना आहारातील आणि जीवनशैलीतील बदल सुचवले जातात आणि पुढच्या काही चाचण्यांची गरज असेल, तर तसे आवर्जून कळवले जाते.
ओरियॉन सिटीकेअर, डॉ. बन्रेला किडनी केअर व आयएमएच्या माध्यमातून हे स्नेहमिलन रविवारी (२२ फेब्रुवारी) सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत संत एकनाथ रंगमंदिरात होणार आहे. अर्थातच, जागतिक मूत्रपिंड दिनानिमित्त होणारा हा संपूर्ण उपक्रम दात्यांसाठी नि:शुल्क असतो, असेही सांगण्यात आले.







