‘लातूरचे ग्रमदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने या वर्षी १५ फेब्रुवारी ते २ मार्च या दरम्यान महाशिवरात्री यात्रा महोत्सव पार पडत आहे. या यात्रा महोत्सवाच्या माध्यमातून लातूरची गौरवशाली परंपरा अधिकाधिक उज्ज्वल करून यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी देवस्थान समितीच्या सहकार्यातून सर्व शासकीय यंत्रणांनी दक्ष राहावे,’ अशी सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी केशव नेटके यांनी दिली आहे.
लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर महाशिवरात्री यात्रा महोत्सवाची पूर्वतयारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठक अतिरिक्त जिल्हाधिकारी केशव नेटके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी देवस्थानचे प्रशासक सचिन जांबूतकर, ज्येष्ठ विश्वस्त तथा माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, अशोक भोसले, नरेश पंड्या, रमेशसिंह बिसेन, व्यंकटेश हालिंगे, विशाल झांबरे, ओम गोपे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
अतिरिक्त जिल्हाधिकारी नेटके म्हणाले, ‘श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने आयोजित होत असलेली महाशिवरात्री यात्रा महोत्सव हे लातूरचे वैभव आहे. या यात्रेची महती लातूर जिल्ह्यासह परजिल्ह्यात व इतर राज्यांतही पोहोचली आहे. यामुळे या यात्रा महोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात भाविक व नागरिकांची मोठी गर्दी होते. ही गर्दी लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावे.’
नेटके म्हणाले, ‘वाहतूक, पार्किंग आणि सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून शहर महापालिका व पोलिस प्रशासनाने तत्काळ आवश्यक त्या उपाययोजना सुरू कराव्यात.’ ‘मंदिर परिसरात स्वतंत्र पोलिस कक्ष स्थापन करून त्या ठिकाणी ध्वनिनिक्षेपक व धोक्याची सूचना देणारी यंत्रणा सज्ज करावी. गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी रांग व्यवस्था योग्य प्रकारे करून या ठिकाणी देवस्थानच्या वतीने स्वयंसेवक नेमावेत,’ अशी सूचना करण्यात आली. ‘महापालिका प्रशासनाने मंदिराकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख मार्गाची तत्काळ दुरुस्ती करून सुरक्षेच्या दृष्टीने पथदिवे तातडीने सुरू करावेत, यात्रा महोत्सव परिसरात आरोग्य यंत्रणा व रुग्णवाहिका सज्ज ठेवावी,’ असेही त्यांनी सांगितले.
‘यात्रा महोत्सवादरम्यान परिसरात स्वच्छता ठेवण्यासाठी मनपा प्रशासनाने विशेष लक्ष देऊन या ठिकाणी स्वच्छता पथक तैनात करण्याची सूचनाही देण्यात आली. यात्रा महोत्सवात जे खाद्य पदार्थाचे स्टॉल उभारले जातात. त्या ठिकाणी कोणतीही भेसळ होणार नाही याची दक्षता घेऊन तेथील खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन अन्न-औषध प्रशासनाने त्याची तपासणी करावे,’ असेही सूचना करण्यात आले. ‘कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्या प्रदर्शनाची अधिकाधिक प्रसिद्धी करून या माध्यमातून शेतकऱ्या मध्ये जनजागृती करण्यात यावी,’ अशी सूचना या वेळी करण्यात आली.
देवस्थानच्या वतीने विक्रम गोजमगुंडे यांनी काही अडचणी मांडल्या. त्या अडचणी सोडविण्यासाठी तत्काळ उपाय योजना करण्यात यावे, असे निर्देश नेटके यानी दिले. या वेळी देवस्थानच्या वतीने यात्रेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते होणारे ध्वजारोहण आणि महाभिषेक यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या वेळी पोलिस, आरोग्य, महापालिका, जिल्हा परीषद, बांधकाम विभाग, महावितरण, अन्न व औषध प्रशासन आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.






