‘गौतमी गोदावरी’वर त्र्यंबकराजाची प्रतिमा

महाराष्ट्र टाइम्स

नाशिक जिल्ह्यात पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार आहे. त्र्यंबकराजाची भव्य प्रतिमा गौतमी गोदावरी धरणावर साकारली जाईल. धार्मिक स्थळांना जोडणारी अमृत यात्रा डबल डेकर बसने सुरू होणार आहे. यामुळे कुंभमेळ्यातील भाविकांना पर्यटनाचा आनंद घेता येईल. रामायण पथ आणि अमृत यात्रा या योजना राज्य परिवहन महामंडळाद्वारे राबवल्या जातील. जिल्हा नियोजन विभागाकडून यासाठी निधी दिला जाईल.

statue of tryambakraj to be erected at gautami godavari boosting nashiks tourism development

जिल्ह्यातील विकासाला गती देतानाच पर्यटनाशी संबंधित विकासावरही जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. त्र्यंबकेश्वरमधील गौतमी गोदावरी धरणावर त्र्यंबकराजाची प्रतिमा साकारण्यात येणार आहे. याशिवाय सर्व धार्मिक स्थळे एकमेकांशी जोडून सुरू करण्यात येणाऱ्या अमृत यात्रेसाठी डबल डेकर बसची विशेष व्यवस्थादेखील करण्यात येणार आहे. त्यामुळे कुंभमेळा काळात येणाऱ्या भाविकांना पर्यटनाची पर्वणी साधता येणार आहे.

जिल्हा नियोजन विभागांतर्गत राज्यस्तरीय ‘डीपीसी’ बैठक मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये जिल्ह्याने पर्यटन व विकास उपक्रमांतर्गत नाशिक दर्शन बससेवा या उपक्रमांतर्गत दोन मार्गांवरून तीन डबलडेकर बसद्वारे भाविकांना पर्यटनासह अमृतयात्रा घडविण्याच्या विशेष योजनेचे सादरीकरण केले. रामायण पथ आणि अमृत यात्रा असे या योजनेचे नाव असून, राज्य मार्ग परिवहन महामंडळ्याच्या वतीने या बस कार्यान्वित होणार आहेत. त्यासाठीचा निधी जिल्हा नियोजन विभागाद्वारे पर्यटन विकासातून दिला जाणार आहे. त्याबाबतचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आले.