सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय आणि महानगरपालिका यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘घनकचरा प्रक्रिया व व्यवस्थापन’ विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उपायुक्त नंदकिशोर भोंबे, प्राचार्य डॉ. सतीश पाटील, विषय तज्ञ रेणुका गायकवाड, डॉ. अनिता देशपांडे, डॉ. अनिल शंकरवार, डॉ. क्षमा खोब्रागडे, प्रा. संजय गायकवाड यांचीही उपस्थिती होती. भोंबे यांनी कचऱ्याचे वर्गीकरण , कचऱ्याचे संकलन, कचऱ्याचे मानवी जीवनावर व पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम, कचऱ्याची योग्य विल्हेवाट व कचऱ्यावर केली जाणारी प्रक्रिया यावर मार्गदर्शन केले. घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखवले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. उमा दासरी पत्तीवार, डॉ. अस्मिता दसपुते , रेखा तिवारी, शालिनी मुंडे, साक्षी पानझडे यांनी परिश्रम घेतले.






