भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. येत्या २० फेब्रुवारी रोजी ही निवडणूक होत आहे. महापालिकेत त्रिशंकू स्थिती असल्याने महापौर कुणाचा होणार हे निवडणुकीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने घोडेबाजार रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील भिवंडी महापालिका वगळता सर्व महापालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली. या महापालिकांमधील नगरसेवक कामाला देखील लागले. मात्र, भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाची निवडणुकीबाबत निर्णय झालेला नव्हता. दुसरीकडे सत्तास्थापनेसाठी महायुतीबरोबर भिवंडी सेक्युलर फ्रंट मैदानात असली तरी ऐनवेळी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कमी नगरसेवक असलेल्या कोणार्क विकास आघाडी, भिवंडी विकास आघाडी तसेच समाजवादी पक्षाचे नगरसेवक कुणाला पाठिंबा देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
१६ जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीचा निकाल लागूनही भिवंडी महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक रखडल्याचे चित्र होते. मात्र, आता सर्वांची प्रतीक्षा संपली असून २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीकरीता पिठासीन अधिकारी म्हणून ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.








