मराठी भाषा गौरवदिनाच्या निमित्ताने मराठी भाषा विभागातर्फे मंगळवारी २०२५च्या साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना साहित्यभूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार असून, श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.
नांदेड येथील निर्मल प्रकाशन संस्थेला श्री. पु. भागवत पुरस्कार, डॉ. दिलीप धोंगडे यांना डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार आणि आपटे वाचन मंदिर, कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार अनुक्रमे विनोद नारायण कुलकर्णी आणि कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद यांना जाहीर झाला आहे. यासोबतच कलारत्न पुरस्कार संगीतकार अजय आणि अतुल गोगावले यांना जाहीर करण्यात आला असून, या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पाच लाख रुपये असे आहे.
या वर्षीपासून विश्व मराठी संमेलन विशेष पुरस्कार सुरू करण्यात आला असून, तो आळंदी येथील शांतिब्रह्म गुरुवर्य मारुतीबाबा कुरेकर यांना देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पाच लाख रुपये असे आहे. नाशिक येथे १५ फेब्रुवारी रोजी पुरस्कार निवड समितीच्या झालेल्या बैठकीत पुरस्कारांची निवड करण्यात आली. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रकारातील प्रौढ वाङ्मय क्षेत्रात २२, बाल वाङ्मय क्षेत्रात सहा, तर प्रथम प्रकाशन क्षेत्रात सहा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मराठी भाषा मंत्र्यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.



